भरधाव कार पुलावरून कोसळली : अमळनेरचे तिघे ठार
Speeding car falls from the bridge : Three killed from Amalner अमळनेर : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाखाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे तिघे ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास नवलनगरजवळ घडला. या अपघातात सरलाबाई पंडीत पाटील (45), मीनाबाई राजेंद्र पाटील (50) व शाहू विजय पाटील (10, सर्व रा.अमळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. पाटील परीवारातील सदस्य नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून कारने परतीच्या प्रवासात असताना क्रुर काळाने त्यांच्या घाला घातला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले आहेत.
नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळली कार
नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परीवार कार (क्र.एम.एच.04 एफ.झेड.3689) ने अमळनेरकडे येत असता फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका मोरी पुलावरून खाली कोसळली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील चार जण जखमी झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
पोलीस अधिकार्यांची धाव
अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाटील परीवारातील अन्य सदस्यांसह नातेवाइकांनी आणि हितचिंतकांनी रूग्णालयात गर्दी केली.


