अमळनेरात दगडफेकीनंतर 48 तास संचारबंदी
नागरीकांना अफवांवर विश्वास न ठेवण्यासह शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन
Curfew for 48 hours after stone pelting in Amalner अमळनेर : शहरात झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस प्रशासनाने वेळीच धाव घेत शांतता प्रस्थापित केली असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात दोन दिवसांची संचारबंदी जारी केली आहे. नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
पोलीस अधिकार्यांची वेळीच धाव
अमळनेर शहरातील जिनगर गल्ली, जुना पारधी वाडा आणि सराफ बाजार परीरसरात शुक्रवारी रात्री 10 वाजता काही लोकांमध्ये हाणामारी झाली व नंतर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी रात्री उशिरा जळगावहुन अधिक कुमक बोलावण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचार्यांनी धाव घेतली. दगडफेकीचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. पोलिसांनी उपद्रवींचा शोध सुरू केला असून शांतता राखण्याचे आवाहन जनतेला केले आहे
जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी ही भेट देत माहिती जाणून घेतली. दोषी असणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले तसेच नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
48 तास संचारबंदी
शुक्रवारी रात्री दहा वाजता शहरात झालेल्या दगडफेकीनंतर अमळनेर शहरात शनिवार, 10 जून रोजी सकाळी 11 ते रविवार, 12 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये आणखी वाढ करण्यात येणार असून अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.


