चाळीसगाव तालुक्यात वनविभागाला दिड कोटींचा चुना : पिलखोडच्या तत्कालीन बँक व्यवस्थापकसह सात संशयितांविरोधात गुन्हा
In Chalisgaon taluka, the forest department was swindled to the tune of one and a half crores: a case against seven suspects including the then bank manager of Pilkhod मेहुणबारे, ता.चाळीसगाव : पिलखोड येथील जळगाव जिल्हा बँक शाखेत वनविभागाची तब्बल एक कोटी 51 लाख 75 हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी तत्कालीन पिलखोडच्या बँक शाखा व्यवस्थापकासह वनविभागाच्या सात अधिकार्यांविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यात अशाच पद्धत्तीने बोगस स्वाक्षर्यांद्वारे शासनाचा निधी लाटण्यात आल्याची चर्चा असून शासनाने या संदर्भात चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.
खोट्या स्वाक्षरीद्वारे काढली रक्कम
मेहुणबारे पोलिसात लक्ष्मण देवराम पाटील (58, द्रोपदी नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 जुलै 2019 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव शाखा पिलखोड, ता.चाळीसगाव येथे तत्कालीन शाखा व्यवस्थापक व हल्ली निलंबित असलेल्या विशाल रावसाहेब देशमुख यांनी प्रशासन, व्यवस्थापन विभागाने त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर व दुरुपयोग केला व रवींद्र विश्वास पाटील, प्रवीण शांताराम पाटील (रा.तामसवाडी, ता.चाळीसगाव, फॉरेस्ट विभाग मालेगाव, सटाणा) व दिंडोरी, सामाजिक वनीकरण विभाग येथील तत्कालीन आरएफओ अधिकारी यांच्या सोबत कट कारस्थान व संगनमत करीत बँक शाखेत बनावट व खोट्या सह्या असलेले विड्रॉल स्लिपाव्दारे रक्कमा काढल्या.
विड्राल स्लीपा केल्या नष्ट
शिाखा व्यवस्थापक विशाल रावसाहेब देशमुख यांना सदरच्या विड्रॉल स्लिपवरील सह्या या बनावट व खोट्या असल्याचे माहिती असून सुध्दा त्या खर्या आहेत, असे भासवून खर्या असल्याचे भासवून व्यवहारात वापर केला आहे तसेच या बनावट सह्या केलेल्या विड्रॉल स्लिपा या बँकेतून परस्पर गहाळ करून पुरावा नष्ट केलेला आहे तसेच शेतकरी पिककर्ज भरणा रक्कमेत अपहार करुन त्यात बँकेच्या खात्यातून रक्कमा काढून त्या बँकेच्या वरीष्ठ कार्यालयाच्या लक्षात येवू नये म्हणून बँक शाखेचा खोटा हिशोब ठेवला आहे.
लेखा परीक्षणात दडपला अपहार
1 जुलै 2019 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये चौकशी अहवालातील रकमा वर्गवारीने जमा नावे करून रोखीने काढून गैरहेतूने गैरव्यवहार करुन बँकेची दिशाभूल करुन वेगवेगळ्या व्यवहारात एकूण रक्कम रुपये एक कोटी 51 लाख 75 हजार 482 रुपये रकमेचा अपहार केलेला आहे. तसेच याच कालावधीत शाखेचे अंतर्गत शाखा परीक्षण करणारे अधिकारी वसंत पुंडलीक पाटील यांनी पिलखोड शाखेची अंतर्गत तपासणी करतांना त्यांनी शाखेतील कोणत्याही प्रकारची दस्ताऐवजाचे परीरक्षण न करता तसेच वरील प्रकरणांकडे मुदाम दुर्लक्ष करून शाखेची अंतर्गत तपासणी अहवालात कोणत्याही प्रकारची त्रृट्या व संशय अहवालात दर्शविला नाही.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी विशाल रावसाहेब देशमुख (रा.देशमुखवाडी, ता.चाळीसगाव), रवींद्र विश्वास पाटील, प्रवीण शांताराम पाटील, मालेगाव वनविभागाचे तत्कालीन आरएफओ, तत्कालीन सटाणा आरएफओ, तत्कालीन दिंडोरी आरएफओ, सामाजिक वनीकरण विभागाचे आरएफओ यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहेत.