जळगाव जिल्ह्यात प्रथमच वाळू तस्करासह हातभट्टी चालकावर स्थानबद्धतेची कारवाई
जळगाव जिल्हाधिकार्यांचे आदेश : अमरावतीसह नागपूरात रवानगी
For the first time in Jalgaon district, action against sand smuggler and hand furnace operator जळगाव : वाळू तस्करीसह अवैधरीत्या गावठी दारू गाळणार्या जिल्ह्यातील दोघांना स्थानबद्ध करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश पारीत केल्यानंतर वाळू माफियांच्या गोटात थरकाप उडाला आहे. जिभाऊ वसंत गायकवाड (34, दापोरा, ता.जळगाव) व ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी (32, कोळन्हावी, ता.यावल) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांची अमरावतीसह नागपूर कारागृहात आदेश मिळताच रवानगी करण्यात आली.
जिल्ह्यातील वाळू माफिया धास्तावले
आतापर्यंत सामाजिक शांततेला बाधा असणार्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर कारवाई केली जात होती मात्र प्रथमच जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या तसेच अवैधरीत्या हातभट्टी चालवणार्यावर कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लवकरच आणखी काहींवर मोठ्या प्रमाणावर कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.
अवैध वाळू वाहतूकदार धास्तावले
जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू वाहतूकदारांनी उच्छाद मांडला आहे तर अवैधरीत्या गावठी हातभट्टी चालकांनी डेरा जमवल्याने अशांविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत जळगाव तालुका व फैजपूर पोलिसांनी प्रस्ताव तयार करून तो वरीष्ठांकडे पाठवला. छाननीअंती हा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दोघांना स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारीत करताच संशयितांची अमरावती व नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली.
यापुढे धडक कारवाई होणार ः जिल्हा पोलीस अधीक्षक
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार म्हणाले की, वाळू माफियांसह अवैधरीत्या हातभट्टी चालकांची पोलीस प्रशासनाने गुन्ह्यांची कुंडली काढून त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्यांचे प्रस्ताव तयार करण्यात करून ते जिल्हाधिकार्यांकडे पाठवले. यापूर्वीदेखील अनेकांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून यापुढेही गुन्हेगार, वाळू माफिया, हातभट्टीचालकांविरोधात कठोर धोरण अवलंबून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.



