आपल्या मतावरच आपली लोकशाही टिकून : भुसावळच्या तहसीलदार निता लबडे
प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मतदान जनजागृती
भुसावळ : महसूल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात सक्षम लोकशाहीची पहिली पायरी म्हणजे मतदान नोंदणी हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात भुसावळ शहराच्या तहसीलदार नीता लबडे यांच्याहस्ते विद्यार्थिनींना मतदान नोंदणी अर्ज वाटप करून करण्यात आला. येत्या दोन दिवसांमध्ये भुसावळ शहरातील पाच महाविद्यालय व शाळांमध्ये मिळून 1800 मतदान नोंदणीचे अर्ज वाटप करण्यात आले आहे. यावेळी नायब तहसीलदार अंगद असटकर आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.डी.देसले उपस्थित होते.
मतदान हा मूलभूत अधिकार ः तहसीलदार
लबडे म्हणाल्या की, मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे. तो सर्वांनी बजवायलाच हवा. कारण आपल्या मतावरच आपली लोकशाही टिकून राहणार आहे. मतदान हा आपला हक्क आणि प्रथम कर्तव्य आहे. लोकशाहीने आपल्याला शिक्षण, अभिव्यक्ती सोबत मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यासाठी आपण जागरूक राहून आपली मतदानासाठी नाव नोंदणी झाली किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगातर्फे देशभर नव मतदार नोंदणी सुरू केलेली आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थिनींनी सहा नंबर अर्ज भरावा. जे बदली होऊन आले असतील त्यांनी सात नंबरचा अर्ज भरून द्यावा, असे आवाहन तहसीलदार यांनी केले.
नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.आर.एच.पाटील यांनी तर आभार प्रा.वाय.डी.देसले यांनी मानले.

