भुसावळकरांना गढूळ पाण्याची शिक्षा : संतप्त रणरागिणींचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला साकडे : सामाजिक कार्यकर्त्या दीपाली बर्‍हाटे यांच्या नेतृत्वात आंदोलन


Dirty Water Punishment for Bhusawalkars : Angry Ranragini March to the Provincial Office भुसावळ : शहराला गेल्या काही दिवसांपासून गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा केला जात असल्याने सोशल मिडीया भुसावळ नगरपालिका चांगलीच ट्रोल होत आहे शिवाय भुसावळकरांमधूनही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गढूळ पाण्यामुळे त्रस्त झालेल्या व मूलभूत समस्यांबाबत चालढकल होत असल्याने शहरातील नाहाटा महाविद्यालय परीसरातील प्रभाग 24 मधील शेकडो महिलांनी गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. प्रभाग 24 मधील समाजसेविका दीपाली गणू बर्‍हाटे (वाणी) यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदारांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. दरम्यान, महिलांनी यावेळी सोबत नळाला गढूळ पाणीपुरवठा झाल्याने हे पाणी बाटलीत आणून अधिकार्‍यांना पिण्याचे आवाहन केल्यानंतर अधिकारीदेखील निरूत्तर झाले. नागरी समस्या न सुटल्यास आगामी काळात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

गढूळ पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात
प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक 24 मध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गटारी व नाले तुडूंब भरले असून पाणी रस्त्यांवर साचल्याने डेंग्यूसह मलेरीयासारखे आजार पसरण्याची भीती आहे. तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. प्रभाग क्रमांक 24 परीसरातील लक्ष्मी नगर, सरस्वती नगर, ऑईल मिल, श्री गजानन महाराज मंदिराजवळील श्रद्धा नगर, स्वामी समर्थ कॉलनी, हिरा नगर, चंद्रमा नगर, पियुष कॉलनी, प्रेरणा नगर, शिव कॉलनी, माऊली नगर, तुकाराम नगर भागात अनेक मूलभूत समस्या आवासून उभ्या असून वेळीच पालिका प्रशासनाने समस्या न सोडवल्यास जिल्हाधिकार्‍यांकडे या समस्या मांडून निवेदन देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर सुमन प्रभाकर भालेराव, वैशाली जाधव, अन्नपूर्णा जाधव, वैशाली कुंभार, रुपाली आटवाल, निशा चव्हाण, सुभद्रा पाटील, कविता सोनवणे, वंदना सोनार, शोभार झारखंडे, शोभा भारंबे, छाया हेडे, उमा राऊत, गंगुबाई बलके, मंजुळा अटवाल, जया बोंडे, जनाबाई गुळवे, सुनीता लाखे, छाया जावळे, माया वाघमारे, दीपाली भंगाळे, मायाबाई कोळी, सुनंदा पवार, सुमन भालेराव, प्रीती झोपे, शुभांगी भारंबे, प्रतिभा पाटील, सपना सोनवणे, पुष्पा बडगुजर, मोनाली सनांसे, कविता फेगडे, मनिषा सोनवणे, मोहिनी बेंडाळे, सुमन बर्‍हाटे, अर्चना इंगळे, चंदा चौधरी, संगीता दंडगव्हाळ, उषा पाटील, शोभा पाटील, मीरा कुयते, सुलभा बोंडे, रुपाली पाटील, शीतल कांडेलकर, लिलावती परदेशी, अन्नपूर्णा जाधव आदींची नावे आहेत.

लवकरच सुटणार समस्या : सतीश देशमुख
हतनूर धरणातून तापी पात्रात सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने दोन दिवस पाण्याची उचल थांबवण्यात आली होती मात्र आता मंगळवारी रात्रीपासून पाण्याची पूर्ववत उचल सुरू करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील 12 एमएलडी प्लँटला ब्लोअर व सॅण्ड फिल्टर लावल्यानंतर गढूळ पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांनी सांगितले. सध्या गढूळ पाण्याची समस्या भेडसावत असल्याने अ‍ॅलमचा वापर वाढवण्यात आला असून भुसावळकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !