भुसावळ विभागातील पहिल्या टप्प्यात सहा रेल्वे स्थानके होणार ‘हायटेक’

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या विकासकामांचा ऑनलाईन शुभारंभ : डीआरएम ईती पांडे यांची पत्रकार परीषदेत माहिती


In the first phase of Bhusawal section, six railway stations will be ‘high-tech’ भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा आत्मनिर्भर अभियान अंतर्गत विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा रेल्वे स्थानकांवरील कामांचा रविवार, 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे शुभारंभ होत असल्याची माहिती भुसावळ विभागाच्या डीआरएम ईती पांडे यांनी शुक्रवारी दुपारी प्रसिद्धी माध्यमांना पत्रकार परीषदेत दिली. डीआरएम कार्यालयात झालेल्या पत्रपरीषदेत पांडे म्हणाल्या की, पहिल्या टप्प्यात सहा रेल्वे स्थानकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्थानकासह विभागातील शेगाव, बडनेरा, मलकापूर, मनमाड, नेपानगर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे तर दुसर्‍या टप्प्यात देवळाली, लासलगाव, नांदगाव, पाचोरा, धुळे, नांदूरा, मुर्तिजापूर, सावदा, रावेर रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे.

आभासी तंत्राद्वारे कामांचा होईल शुभारंभ
डीआरएम पांडे म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील रेल्वे स्थानकावर पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे रविवारी सकाळी 11 वाजता लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल व आभासी तंत्राद्वारे ते पहिल्या टप्प्यातील रेल्वे स्थानकांच्या कामांचा आभासी तंत्राद्वारे शुभारंभ करतील. यासाठी प्रत्येक स्थानकावर किमान दोन हजार नागरीकांची सोय होईल या पद्धत्तीने व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित असतील. रविवारी सकाळी नऊ वाजेपासून विविध कार्यक्रम संबंधित रेल्वे स्थानकावर होणार असून त्यादृष्टीने कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे आल्याचे त्या म्हणाल्या.





प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा पुरवणार
डीआरएम म्हणाल्या की, सर्वसामान्य प्रवासी केंद्रबिंदू मानुन त्यांना सर्वोतोपरी सुविधा देण्यास प्राधान्य आहे. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण केले जात असून त्यात प्रवेशद्वार आकर्षक करणे, रंगरंगोटी, टॉयलेट, पादचारी पूल तयार करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. दिव्यांग बांधवांसाठी एक्सलेटर, लिप्ट आदी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

कोच रेस्टारंट होणार नाही : डीआरएम
रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातच कोच रेस्टारंट संकल्पना राबवली जात असल्याने त्यामुळे अनेक गैरसोयी निर्माण होणार असल्याची बाब माध्यमांनी डीआरएम पांडे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सुरूवातीला त्याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले मात्र नंतर कोच रेस्टारंट होणार नसल्याचे सांगून निविदा प्रक्रिया जरी राबवण्यात आली असलीतरी त्याबाबत रीएक्झामीन (पुर्नपरीक्षण) सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुसाफिर खान्यातील पाण्याची प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, भुसावळ जंक्शन हे मोठे स्थानक असल्याने त्यासाठी 340 कोटींच्या निधीतून विकासआराखडा तयार केला जात असल्याचे पांडे म्हणाल्या.

पहिल्या टप्प्यात सहा रेल्वे स्थानके होणार हायटेक
आत्मनिर्भर अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यातील बडनेरा, शेगाव, मलकापूर, नेपानगर, चाळीसगाव व मनमाड रेल्वे स्थानके कात टाकतील. त्यात दोन प्रवेशद्वार, नवीन शौचालय, प्रत्येक प्लॅटफार्मवर पाण्याची व्यवस्था, पंखे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, लिप्ट, बुकींग कार्यालयाचे नूतनीकरण तसेच रूफ प्लाजा, एक्झिक्यूटिव्ह लॉज, स्टेशनचे अप्रोचेस, सर्क्यलेटिंग एरीया, लॅण्डस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस, केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निच, भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नावाचे बोर्ड, पार्किंग व्यवस्था, प्रतीक्षालय, याशिवाय प्लॅटफॉर्मची लांबी तसेच दिव्यांगासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !