केळी महामंडळाच्या कामाला लवकरच सुरूवात : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद


रावेर : केळी महामंडळासाठी जळगाव येथे जागा निश्चित करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला असून लवकरच महामंडळाच्या कामाला सुरुवात होईल. जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी निर्यातक्षम केळी उत्पादनाबरोबरच पॅकेजिंग, ग्रेडिंग, ट्रान्स्पोर्टेशन आणि जागतिक बाजारपेठेतील भावाचा अभ्यास करायला हवा. आधुनिक शेतीच्या बरोबरच शेतकर्‍यांना शेतमालाच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी बाजार समिती सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रावेरातील शेतकरी मेळाव्यात केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित शेतकरी कृषी मेळावा रावेर येथे झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, उद्योजक श्रीराम पाटील, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बी.ए.कापसे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, मिलिंद पाटील उपस्थित होते.

भूजल पातळी वाढवा
जिल्हाधिकारी म्हणाले की, हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. जमिनीत पाणी जिरवण्यासाठी रीचार्ज शाफ्ट करावे लागेल. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न सामूहिक प्रयत्न करू. पाण्याच्या बचतीसाठी शेतकर्‍यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर अजून वाढविण्यासाची गरज असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले

पर्यावरणाच्या समतोलसाठी झाडे लावा : डख
हवामान तज्ञ पंजाबराव डख बोलतांना म्हणाले की, जगात वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे प्रचंड वृक्ष तोड झाली. सिमेंटची घर, रस्ते यामुळे तापमानात वाढ झाली. पर्यायावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा विपरीत परीणाम पर्जन्यमानावर झाला आहे. पर्यावरणाच्या समतोलपणा राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. पाऊस केव्हा पडतो किंवा केव्हा लांबतो याबाबतची आपली निरीक्षणे सादर करून या अंदाजानुसार शेती कामांचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, कृऊबा संचालक राजेंद्र चौधरी, योगीराज पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, पितांबर पाटील, प्रल्हाद पाटील, पांडुरंग पाटील, गणेश महाजन, विलास चौधरी,सोपान पाटील, छोटू पाटील, यादवराव पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी केले. बाजार समितीने घेतलेले निर्णय, आणि बाजार समिती संचालक मंडळ राबवीत असलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. सचिव गोपाळ महाजन यांनी आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !