भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर शिवसेनेची निदर्शने

लाभार्थींची तहसीलकडून परवड : योजनांचा लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


Shiv Sena protests outside Bhusawal Tehsil office भुसावळ : एकीकडे जिल्हा प्रशासन गतिमान झाल्याचा दावा करीत असताना दुसरीकडे स्थानिक तहसील कार्यालयात मात्र विविध योजनांची प्रकरणे सादर करणार्‍या लाभार्थींची फिरवाफिरव होत आहे. चार-चार महिने उलटूनही योजनांबाबत आढावा बैठक घेतली जात नसल्याने लाभार्थींना आल्या पावल्या माघारी फिरावे लागत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा गटातर्फे बुधवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जोरदार निदर्शने करण्यात आली तसेच तहसील कार्यालयाच्या कृतीचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार निता लबडे यांना देवून तत्काळ लाभार्थींची अडवणूक न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

वर्षभरापासून लाभार्थी झिजवताय उंबरठे
शिवसेना उबाठा गटातर्फे प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, भुसावळ शहर व तालुक्यातील लाभार्थींनी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजनांच्या प्रकरण मंजुरीबाबत सुमारे वर्षभरापासून प्रकरणे तहसील कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. या संदर्भात तहसील कार्यालयात चार वेळा बैठक झाल्या मात्र या बैठकांमध्ये या लाभार्थींना न्याय मिळालेला नाही. विविध योजनांचा लाभ मिळेल म्हणून लाभार्थी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत मात्र त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांना आल्या पावल्या माघारी परतावे लागत आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी त्यांना नेहमी-प्रमाणे उडवा-उडवीचे उत्तर देत असून पुढील बैठकीत तुमच्या प्रकरणांना मंजुरी मिळेल, असे सांगून त्यांना माघारी परतवत आहेत. योजनांच्या आढाव्याबाबत दर महिन्याला बैठक होणे क्रमप्राप्त असताना चार-चार महिने बैठक घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

रेशन धान्य वितरणातही मनमानी
आबालवृद्धांची बोळवण करणार्‍या मुजोर अधिकार्‍यांवर कारवाई करावी तसेच प्रलंबित प्रकरणे तत्काळ मंजूर करून लाभार्थींना दिलासा द्यावा तसेच रेशनकार्ड असतानाही त्यातील चार सदस्यांऐवजी केवळ दोघांच्या नावाने रेशन धान्य वाटप करणार्‍या दुाकनदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. स्वस्त धान्य काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर या प्रकारांना पायबंद न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा प्रमुख कैलास लोखंडे, शहर प्रमुख दीपक धांडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, तालुका संघटक बबलू बर्‍हाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, युवा सेना तालुकाप्रमुख सुरज पाटील, शहरप्रमुख पवन बाक्षे, हेमंत बर्‍हाटे, बबलू धनगर, हेमतं खंबाईत, दिलीप सुरवाडे, वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, राकेश खरारे, सोनी ठाकूर, स्वप्नील सावळे, धनराज ठाकूर, पिंटू भोई, योगेश बागुल, अरुण साळुंके, नरेंद्र लोखंडे, नबी पटेल, कल्पेश सोनावणे,भूषण तायडे,लोकेश वारके, शरद जयस्वाल, धीरज सोनावणे, संदीप पाटील, शरद जोहरे, प्रमोद राऊत, संजय शिंदे, दिलीप चौधरी, सुधाकर पवार,राजू जैन,दिपक सुर्यवंशी,आनंद वाटपाडे , विठ्ठल बाविस्कर,चेतन भोई, चेतन नाईक, अरुण पाथरवट, सागर कोळी, मनोज कोळी, भीमराव तायडे, मुकेश घारू, जितेंद्र पाटील, गौतम तायडे, राजेश महाजन, मनोज जाधव, उल्हास भारसके, किशोर कोळी, भुरा हटकर व शिवसैनिक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !