भुसावळातील वाल्मीक नगरात गोळीबार : आरोपी जाळ्यात
दहशतीसाठी झाडल्या दोन फैरी : आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
Firing in Valmik Nagar in Bhusawal : Accused in jail भुसावळ : दहशत निर्माण करण्यासाठी वाल्मीक नगर भागातील रेकॉर्डवरील आरोपीने आपल्याजवळील गावठी कट्ट्यातून हवेत दोन फैरी झाडल्याची धक्कादायक घटना बुधवार, 23 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही मात्र गोळीबार झाल्याची माहिती यंत्रणेला मिळताच अधिकार्यांनी धाव घेत संशयित विकेश श्याम सारवान उर्फ विक्की किशोर टाक (42, वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) याच्या मुसक्या बांधल्या असून त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व झाडलेल्या दोन गोळ्यांचे केस (पुंगळ्या) जप्त केल्या आहेत.







दहशत निर्माण करण्यासाठी केला गोळीबार
सूत्रांच्या माहितीनुसार, विक्की किशोर टाक (42) हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात चोरी, घरफोडी तसेच आर्म अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल आहेत. आरोपीने बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास स्वतःकडील गावठी कट्ट्यातून हवेत दोन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबारानंतर वाल्मीक नगर परीसरात मोठी खळबळ उडाली तर सुदैवाने कुणी जखमी झाले नसलेतरी बाजारपेठ पोलिसांपर्यंत गोळीबाराची माहिती पोहोचल्यानंतर बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी केली. यावेळी संशयित विक्की टाक यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत गावठी कट्टा काढून दिला तसेच यंत्रणेने संशयिताच्या घराजवळून हवेत गोळीबार केल्यानंतर रीकाम्या काडतूसाच्या दोन पुंगळ्या जप्त केल्या.
आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, हवालदार विजय नेरकर
हवालदार यासीन पिंजारी, हवालदार महेश चौधरी, हवालदार रमाकांत सुरळकर, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल सचिन पोळ आदींच्या पथकाने रात्री उशिरा आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संशयिताला गुरुवारी सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मध्यरात्री झालेल्या गोळीबारानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.


