भुसावळ विधानसभेच्या जागेवर आरपीआय दावा करणार !
केंद्रीय मंत्री रामदास आठवले : भुसावळात अण्णाभाऊ साठे स्मारकाचे उद्घाटन
RPI will claim Bhusawal assembly seat! भुसावळ : विरोधकांना कितीही बैठका घेवू द्या, आगामी 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. 40 आमदार भाजपाकडे आले त्यामुळे उद्धव ठाकरेंविरोधात संताप मतदार मतपेटीतून व्यक्त करतील व मॅच आम्हीच जिंकू, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. ते म्हणाले, भुसावळची जागा ही भाजपाकडे असून आमदार संजय सावकारे हे विद्यमान आमदार आहेत मात्र या जागेची मागणी आरपीआयकडून करण्यात येईल व ताकदीनिशी आम्ही निवडणूक लढवू, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे उद्घाटन व मार्गाचे उदघाटन गुरूवारी सकाळी 10 वाजता त्यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भुसावळच्या जागेवर दावा करणार
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते भारत मेडिकल समोरील साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे व मार्गाचे उद्घाटन करण्या आले. रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी या स्मारकाची उभारणी केली असून यावेळी आठवले म्हणाले की, भुसावळ विधानसभेची जागा ही राखीव जागा असून ही जागा रीपाईला मिळावी, असा प्रयत्न आम्ही मागणी करून करणार आहोत. राजू सूर्यवंशी यांचे समाजाभिमुख काम असून त्यांच्यात संघटन कौशल्य असल्याने पक्षाची बांधणी चांगली असल्याचेही ते म्हणाले. स्मारक समितीमधील रीपाइं युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, विकास वलकर, लहूजी शक्ती सेना युवा जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे, मातंग समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

