मुख्यमंत्र्यांनी पाचोर्यात ठाकरेंवर चालवले टिकेचे बाण ; म्हणाले, बोलायला लावू नका, अन्यथा पाटणकर काढा घ्यावा लागेल
पाचोरा : जळगावातील पुतळा उद्घाटन कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर कणखर शब्दात टिका केली होती. या टिकेला पाचोरा येथील कार्यक्रमात मुख्यमात्र्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आम्हाला सर्व माहिती आहे. आम्हाला बोलण्याची वेळ आणू नका, नाहीतर तुमच्यावर पाटणकरांचा काढा घ्यायची वेळ येईल, अश्या शब्दात मंगळवारी पाचोरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री मंत्री गिरीष महाजन, मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, सुरेश भोळे, जयकुमार रावल, किशोर पाटील, लता सोनवणे, चंद्रकांत पाटील, संजय सावकारे, मंगेश चव्हाण यांच्यासह प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

युटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे नाही ?
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील सभेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. शिंदे यांनी दिल्लीत ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान यांची भेट घेतली. त्यावरुन ठाकरेंनी ते शिंदे त्यांच्याशी काय बोलले असतील कोणत्या भाषेत बोलले असतील म्हणत खिल्ली उडवली होती. यावर शिंदे यांनी, सुनक मला, ‘हाऊ इज युटी?’ म्हणाले. मी म्हणालो ‘व्हाय?’ त्यावर, युटी ब्रिटनला येतात मालमत्ता घेतात. थंड हवा खातात. त्यांचे सर्व मला माहिती आहे. तुम्ही लंडनला या सांगतो, असेही सुनक म्हणाले. तुम्हाला ‘युटी’ म्हणजे माहितीय ना? असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
त्यांना पोटशूळ म्हणूनच आता डॉक्टर आपल्या दारी संकल्पना आणणार
सत्ता असताना ते घरी बसले. आम्ही आता जनतेच्या दारी जात आहोत, तर ते आमच्यावर टीका करीत आहेत. त्यांचा पोटशूळ होत आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर उपाय म्हणून षडॉक्टर आपल्या दारी’ ही योजना लवकरच राबविणार आहोत. त्यांचे सरकार गेले आहे. मात्र, ते मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे ते काहीही बोलू लागले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही ते कोणत्याही भाषेत बोलू लागले आहेत. आमची सत्ता आल्यावर आम्ही अनेक धाडसी योजना राबवित आहोत, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी विविध योजना राबवित असल्याचेही शिंदे म्हणाले. ‘
शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात आतापर्यंतच्या 14 कार्यक्रमातून 1 कोटी 61 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्र शासनाचे नेहमीच पाठबळ असते. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दहा हजार कोटींचा करमाफी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. जी-20 परिषदेत भारताचा ठसा उमटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासनाने 35 जल सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे 8 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

