हतनूरच्या बॅक वॉटरमुळे आठशे हेक्टरवरील केळीचे नुकसान
रावेर : हतनूर धरणातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसानंतर संपूर्ण दरवाजे उघडताच तापी नदीला पूर आला व धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी रावेर तालुक्यातील शेत-शिवारात शिरत असताच वादळी वार्यासह पावसाने हजेरी दिल्यानंतर रावेर तालुक्यातील एक हजार 438 शेतकर्यांचे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रातील केळीसह कापूस पिकाचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
कोट्यवधींची हानी सरसकट हवी भरपाई
अतिवृष्टीमुळे तापी नदीला महापूर आल्यामुळे हतनूर धरणाचे बॅक वॉटर शेतशिवार व रस्त्यावर आल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. बॅक वॉटरचे पाणी ऐनपूर निंबोल, खिरवड, नेहेते विटवा पातोंडी येथे नदीकाठी शेतीत पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार हवेमुळे केळीची खोडे आडवी पडली तर वादळी वार्यामुळे कर्जोद अहिरवाडी, जुनोने, केर्हाळा, पिंप्री, मंगरूळ, अभोडा, भाटखेडे, उटखेडा, वडगाव, कुंभारखेडा, चिनावल, खिरोदा आदी गावातील शेती शिवारातील काही शेतात केळी खोडे जमीनदोस्त झाली. रावेर तालुक्यात या आपत्तीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

रावेर तालुक्यात 1438 शेतकर्यांचे नुकसान
अतिवृष्टीसह वादळीवार्यामुळे रावेर तालुक्यातील एक हजार 994 शेतकर्यांच्या 836 हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले तर 242 शेतकर्यांच्या 137 हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले. रावेर तालुक्यातील 63 गावातील एकुण1438 शेतकर्यांचे 973 हेक्टरवरील कापूस, केळीचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

