भुसावळातील खड्डे, पथदिवे व स्वच्छतेचा प्रश्न दहा दिवसात मार्गी लावणार !
शिवसेना उबाठा गटासोबतच्या बैठकीत भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची ग्वाही
The problem of potholes, street lights and cleanliness in Bhusawal will be resolved in ten days! भुसावळ : शिवसेनेच्या उबाठा गटाने स्थानिक पालिकेकडून मूलभूत समस्या सुटत नसल्याने शहरातील विविध सहा ठिकाणी शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी आंदोलन केले होते. खड्डेमय रस्त्यांमध्ये बेशरमीचे झाड लावून पूजन करण्यात आले तर अनियमित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ जलशुद्धीकरण केंद्रात माठ फोडून पालिकेचा निषेध करण्यात आला. यानंतर भुसावळ पालिकेत पदाधिकार्यांनी समस्या सुटण्यासाठी ठिय्या मांडला होता. यावेळी उपमुख्याधिकार्यांनी प्रशासकांच्या उपस्थितीत सोमवारी बैठकीचे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी तीन वाजता प्रांताधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यासह अस्वच्छता तसेच पथदिवे व रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दहा दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिले.
दीपक धांडे यांनी मांडला पाणीप्रश्न
शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांनी शहरवासीयांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. शहरवासीयांना 12 ते 15 दिवसाआड पाणी मिळते तर गरीब जनतेकडे पाणी साठवण्यासाठी सुविधा नसल्याने त्यांना पुन्हा पाण्याची भटकंती करावी लागत असल्याने पाणीप्रश्न सोडवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दहा दिवसात सुटणार समस्या
शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची झालेल्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना सोसावा लागणारा त्रास तसेच वाहने खिळखिळी झाल्याची तक्रार यावेळी करण्यात आली तसेच शहरातील विविध भागात स्वच्छता होत नसल्याने आरोग्य धोक्यात आल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली. शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकार्यांनी मांडलेल्या सर्व समस्या प्रशासकांनी जाणून घेत सर्व समस्यांचे आगामी दहा दिवसात निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
यांची होती बैठकीला उपस्थिती
प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत पालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी, सतीश देशमुख, शिवसेना पदाधिकारी बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक पप्पू बारसे, स्वप्निल सावळे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, पिंटू भोई, अमजद शेख, नबी पटेल, मनोज पवार, महमूद शेख, राकेश खरारे, अरुण साळुंके आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

