भुसावळ नगरपालिकेच्या अधिकार्यांनी सायकलवर फिरुन घेतला शहराच्या स्वच्छतेचा आढावा
दुकानदारांकडून सात किलो प्लॅस्टीक कॅरीबॅग जप्त : स्वच्छतेबाबत शहरात जनजागृती
Officials of Bhusawal Municipality reviewed the cleanliness of the city by cycling भुसावळ : भुसावळ पालिकेने स्वच्छता पंधरवड्यात शहरातून सकाळी सायकल दौरा सुरू केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे व सर्व विभागांचे प्रमुख सकाळी सायकलवरील शहरात फिरून स्वच्छतेचा आढावा घेत आहेत. यासोबत पाहणी दरम्यान शहारातील दुकानदारांकडून बंदी असलेल्या प्लास्टीक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. पालिकेने मंगळवारी तब्बल सात किलो प्लॉस्टीक कॅरीबॅग जप्त करुन विक्रेत्यांना वापर थांबविण्यासाठी आवाहन केले.
पालिकेकडून व्यापक उपाययोजना
शासनातर्फे राबविण्यात येणार्या स्वच्छता पंधरवड्यात पालिकेने व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंगळवारी स्वत: मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, प्रशासन अधिकारी परवेज शेख, आरोग्य अधिकारी प्रदीप पवार आदींसह सर्व विभाग प्रमुखांनी सकाळी सहा वाजताच सायकलवरून शहरात दौरा केला. शहरातील जाम मोहल्ला, खडकारोड, मुख्य बाजारपेठ परीसर, जामनेररोड आदी भागात स्वच्छतेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान पालिकेने शहरात सर्वाधिक कचरा उत्पन्न करणार्या व शासनाने बंदी लादलेल्या 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक कॅरीबॅग विक्री, वापर करणार्यांना समज दिली. खाद्यपदार्थ, फळविक्रेते, दुकानदारांना भेटी देवून त्यांच्याकडे वापरात असलेल्या कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. या कॅरीबॅगचा वापर करु नये, अशा सूचना मुख्याधिकारी वाघमोडे यांनी दिल्या.

विक्रेत्यांकडून कॅरीबॅग जप्त
सध्या पालिकेकडून समज देवून प्रबोधन केले जात आहे. यानंतरही विक्रेत्यांनी या कॅरीबॅगचा वापर केला व तो आढळून आला तर पाच हजार रुपये दंड, दुसर्यांदाही वापर आढल्यास 10 हजार रुपये दंड यानंतरही तिसर्यांदा कॅरीबॅगचा वापर आढळून आला तर 25 हजार रुपये दंड केला जाणार आहे. यामुळे शहरातील कॅरीबॅगचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. पालिकेने विक्रेत्यांना अल्टीमेटम दिला असल्याने वापर कमी होण्यास मदत होईल. मात्र पाालिकेकडूनही कारवाईत सातत्य असणे आवश्यक आहे.
नागरीकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या
शहरातील स्वच्छतेच्या संदर्भात मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी विविध भागांमध्ये सायकलवर फिरुन नागरीकांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या. काही भागात कचरा उचलला जात नाही. यामुळे पालिका प्रशासनाकडून आता वाढीव घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील गल्लीबोळात ज्या भागात घंटागाड्या जावू शकत नाहीत, तेथेही कचरा उलण्यासाठी पालिकेने व्यापक नियोजन केल्याचे मुख्याधिकारी वाघमोडे यांनी सांगितले.

