केळी करपा रोगाच्या निर्मूलनासाठी करपा पॅकेज मंजूर करा
भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची कृषी मंत्र्यांना साकडे
Approve Karpa package for elimination of Banana Karpa disease यावल : जळगाव जिल्ह्यातील केळीवर पावसासह उष्ण व आर्द्रतायुक्त हवामानामुळे केळी पिकाच्या पिलबागा, कापणीवरील नवती बागांवर बुरशीजन्य सिगाटोका, करप्याने विळखा घातला आहे. केळी उत्पादक आर्थिक तसेच मानसिक संकटात सापडला आहे. सध्याची परीस्थिती लक्षात घेता करपा निर्मूलनासाठी पूर्वीचे पॅकेज पूर्ववत करून नवीन पॅकेज मंजूर करावे, अशी मागणी जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी मुंबई येथे मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत केली. मागणीबाबत निवेदन देण्यात आले.
45 हजार हेक्टरवर पसरला करपा
यंदा प्रथमच करप्याची भीषण लाट उसळली आहे. जिल्ह्यातील सुमारे 45 हेक्टर केळी बागांवर करप्याने विळखा घातला आहे. यात दोन-तीन महिन्यांच्या केळी बागांसह, निसवणीच्या अवस्थेत असलेल्या पिलबागा व कापणीवरील असलेल्या नवती बागांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे, त्यामुळे केळी उत्पादक शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

‘ते’ पॅकेज पुन्हा सुरू करावे
करपा निर्मूलनासाठी गत दशकापूर्वी तत्कालीन खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे तगादा लावून 95 कोटी रुपयांचे करपा निर्मूलन पॅकेज मिळवून कृषी विभागाद्वारे शेतकर्यांना मोफत औषधे उपलब्ध करून दिली होती. काही वर्षात त्यातील 35 कोटी रुपये खर्ची पडल्यानंतर सद्य स्थितीत हे पॅकेज बंद आहे. सध्याची परीस्थिती लक्षात घेता करपा निर्मूलनासाठी हे पॅकेज पूर्ववत करून नवीन पॅकेज मंजूर करावे, अशी मागणी अमोल जावळे यांनी .कृषी मंत्री धनंजय मुंढे यांना केली आहे. केळी उत्पादकांना भेडसावणार्या विविध समस्यांबाबत यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली तर या संदर्भात लवकरच बैठक घेवून शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, असे अश्वासन या प्रसंगीधनंजय मुंढे यांनी अमोल जावळे यांना दिले.

