आदिवासी समुदायातील नऊ बालकांच्या आयुष्यात पेटला शिक्षणाचा ज्ञानदीप


मुक्ताईनगर : गणेश उत्सवाचे औचित्य साधून गणपती बाप्पाची आराधना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे श्री गणेशा शिक्षणाचा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी शालेय शिक्षण सोडलेल्या किंवा शाळेत प्रवेश न घेतलेल्या शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करून शाळेत प्रवेश मिळवून देत आहेत. या अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासी समुदायातील शिक्षणापासून वंचित नऊ शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश मिळून त्यांच्या जीवनात अज्ञानाचा अंधकार दूर होऊन शिक्षणाचा ज्ञानदीप पेटला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी नंदुरबार जिल्हाध्यक्षा मंजुळा पाडवी यांनी शहादा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या नऊ मुलांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगत त्यांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत दाखल करण्यास प्रवृत्त केले.

मडकानी, ता.शहादा या गावातील प्रमिला दिलीप भिलावे, विक्की शंकर ठाकरे, सुरज प्रल्हाद भिलावे, रामपूर, ता.शहादा या गावातील मीना सोमसिंग ठाकरे, हिना सोमसिंग ठाकरे, हिना अजय वाघ, फत्तेपूर, ता.शहादा या गावातील नितेश रतीलाल ठाकरे, सोहम विजय वळवी, रघुनाथ दिलीप पवार या एकूण नऊ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले. मंजुळा गावीत यांनी स्वखर्चाने या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शिक्षकांच्या हस्ते वाटप केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा चिटणीस मनिषा बेडसे, युवती जिल्हाध्यक्ष तिथलं पावरा आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !