भुसावळ विभागातील चार कर्मचार्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार
General Manager’s Safety Award to four employees of Bhusawal Division भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चार रेल्वे कर्मचार्यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामाबद्दल महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार देऊन मुंबई येथे मंगळवारी गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्याहस्ते देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात जून ते सप्टेंबर 2023 या महिन्यात कर्तव्यादरम्यानची सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे संचालनात संरक्षितता सुनिश्चित करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल भुसावळ विभागातील चार कर्मचार्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक व रोख दोन हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
चांगल्या कामाची रेल्वेतर्फे दखल
रेल्वेतर्फे कर्मचार्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात येत असते. याचाच भाग म्हणून भुसावळ विभागातील चार कर्मचार्यांचा गौरव झाला.
विभागातील हिरापूर येथील पॉइर्ंंटमन दिनेश पाटील यांनी 30 ऑगस्ट 2023 या दिवशी कर्तव्यावर असतांना कर्नाटक एक्स्प्रेसच्या मागील डब्यातून धूर निघत असल्याचे पाहता लाल सिग्नल देऊन रेल्वे गाडी थांबविली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
नेपानगर येथील उपस्टेशन व्यवस्थापक शशिकांत सिंह हे कर्तव्यावर असतांना मालगाडीतील लोखंडी लोड बंडल सैल झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधितांना माहिती दिल्याने अनर्थ टळला.
नांदगाव येथील रहिवासी असिस्टंट लोको पायलट अमोल आव्हाड हे 30 ऑगस्टला कामावर असतांना घोटी स्टेशनवर लाईन क्लिअर होण्याची वाट पाहत असताना स्टार्टरजवळील रेल्वे जॉईंटचे नट सैल स्थितीत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना कळवले आणि समस्या सोडवल्याने दुर्घटना टळण्यास मदत झाली.
बोदवड येथील मनोज संजय पाटील हे ट्रॅकमन असून ते 21 ऑगस्ट 2023 या दिवशी कामावर असतांना रेल्वे वेल्डींग फ्रॅक्चर झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकार्यांना माहिती दिली. पाटील यांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली. अश्या चार जणांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी एम.एस.उप्पल, राजेश अरोरा, सुनील कुमार, शरद चंद्रायन, एच.एम.शर्मा आदी उपस्थित होते.
