पी.एम. किसान योजना शिबिरात 465 शेतकर्यांच्या अडचणी दूर
कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन
यावल : कृषी मित्र माजी खासदार कै.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकर्यांच्या समस्या सोडवल्या जाण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पीएम किसान योजनेतील लाभापासून वंचित शेतकर्यांकरीता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये तालुक्यातील तब्बल 465 शेतकर्यांची उपस्थिती दिली. या शिबिराचा शुभारंभ कृषी मित्र माजी खासदार कै.हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, कृषी अधिकारी भरत वारे, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, उपसभापती बबलू कोळी, बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, उमेश पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव, पंकज चौधरी, दीपक पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, यशवंत तळेले, डॉ.कुंदन फेगडे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे, कृषी सहाय्यक एस. बी. सिनारे, स्नेहल फिरकेसह तालुक्यातील सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व कृषी विभागाचे सर्व कर्मचारी आणि बाजार समितीचे सर्व कर्मचारी व शिपाई यांची उपस्थिती होती. बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील म्हणाले की, कृषी मित्र माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांची सातत्याने शेतकर्यांसाठी तळमळ असायची म्हणून त्यांच्या जयंती निमित्त आपण शेतकर्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजनकेले असून हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे ते म्हणाले.

महिलांसाठी स्वतंत्र स्टॉल
यावल तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर महिला शेतकरीदेखील या पी.एम.किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे या शिबिरातून दिसून आले. महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता महिला कृषी सहाय्यकांच्या सहभागाने महिलांचे स्वतंत्र एक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आला. महिलांच्या तक्रारी महिला अधिकारी कर्मचार्यांनी सोडवल्या.
छाननीसाठी तीन स्टॉल
पी.एम.किसान सन्मान योजनेत लाभापासून वंचित शेतकर्यांच्या प्रकरणाच्या छाननीसाठी स्वतंत्र तीन स्टॉल लावण्यात आले. तेथे त्यांच्या समस्या नेमक्या काय ? याची पडताळणी केल्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात शेतकर्यांच्या समस्यांचे व्यवस्थित निराकरण करण्यात आले. पी.एम.किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित शेतकर्यांना ही समस्या सोडवण्यासाठी तहसील कार्यालयाचे तलाठी तसेच पीएम किसान योजनेचे डाटा ऑपरेटर स्नेहल फिरकेंसह सर्व तलाठी, कृषी सहाय्यक आणि बाजार समितीचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

