भुसावळ विभागात रेल्वे लाईनीवर 24 तास किमॅनसह आरपीएफची गस्त
24 hours patrolling of RPF along with KIMAN on railway line in Bhusawal division भुसावळ : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आकुर्डी सेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी चार वाजता कोणी विध्नसंतोषी लोकांनी रेल्वे रूळांवर मोठ्या प्रमाणावर दगड ठेवले मात्र गस्तीवरील रेल्वे कर्मचार्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी रूळावरील दगडे हटवलीत. याच पार्श्वभूमीवर अप्रिय घटना टाळण्यासाठी भुसावळ विभागात सुध्दा रेल्वे रूळांच्या गस्तीसाठी किमॅन, गॅगमन यांची 24 तास गस्त वाढवण्यात आली आहे.
प्रत्येक सेक्शनमध्ये कर्मचार्यांची गँग कार्यरत
प्रत्येक सेक्शनमध्ये कर्मचार्यांची गँग कार्यरत आहे, अशी माहिती डीआरएम ईती पांडे यांनी दिली. पुणे विभागात झालेल्या या प्रकारामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. रेल्वे रूळांवरील गस्त सक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर भुसावळ येथील डीआरएम पांडे यांनी सांगितले की, भुसावळ विभागात प्रत्येक सेक्शनमध्ये गँग कार्यरत आहे, ते रूळांची देखभाल करीत असतात तसेच की मॅन सुध्दा प्रत्येक 3 किलोमीटर अंतर पायी गस्त करून रूळांचे नट, क्लिप यांची पाहणी करतात.
रात्री – दिवसा धावणार्या मेल, एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये आरपीएफची गस्त ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना काही संशयीत वस्तू दिसल्यास त्यांनी आरपीएफ अथवा लोहमार्ग पोलिस यांना माहिती द्यावी, असे आवाहन डीआरएम ईति पांडे यांनी केले आहे. रेल्वे गाड्यांचा प्रवास हा भुसावळ विभागातून सुकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी हे सतर्क झाले आहे.
