सावद्यात नवीन वीज मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला भाजपाचा विरोध
सावदा : शहरात गत दोन दिवसांपासून महावितरणच्या माध्यमातून नागरीकांकडील विद्युत मीटर काढून ते विद्युत खांबांवर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्युत मीटर बसविण्यासाठी पेट्यांचा वापर करण्यात येत असून या पेट्या विद्युत खांबांवर लावण्यात आल्या आहेत. या पेट्यांमुळे अनेक व्यावसायीकांचे दुकानात येण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण होत आहे. या पेट्या विद्युत खांबाच्या बाहेर लावल्यात आल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे परीणामी अपघात होण्याची भीती आहे. यासंदर्भात अनेक नागरीकांच्या व व्यावसायीकांच्या तक्रारी वाढल्यानंतर गुरुवार, 12 रोजी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वात महावितरणचे कार्यकारी अभियंता सपकाळे यांना निवेदन देण्यात आले.
तर लोकशाही मार्गाने आंदोलन
भाजपाच्या निवेदनानुसार, वीज मीटर खांब्यावर लावण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात इतर कुठेही सुरू नसताना फक्त सावदा शहरात सुरू करण्यात आली आहे. वीज मीटर लावण्याच्या या प्रक्रियेला त्वरीत स्थगिती देण्यात यावी अन्यथा याप्रकरणी लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करण्याचा इशारा भाजपातर्फे देण्यात आला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष जे.के.भारंबे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’च्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख मनीष भंगाळे, अक्षय सरोदे, सचिन बर्हाटे, सागर पाटील, मुरली चौधरी, कृष्णा पाटील, संजय बानापुरे, युवराज नेमाडे, विनोद नेमाडे, भारत चव्हाण, ललित महाजन, चंदन पाटील, निलेश अच्युत, सुधीर भंगाळे, ललित चौधरी, प्रितेश सरोदे, ईश्वर नेमाडे, भाजपा सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले यांच्यासह भाजपा सेना युतीचे अनेक पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.


