205 अल्पवयीन मुले पालकांच्या कुशीत ; रेल्वे सुरक्षा बलाने घडवली भेट
भुसावळ : पालक रागावल्याच्या किरकोळ निमित्ताने संतापातून घराबाहेर पडलेल्या मुला-मुलींना रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेत त्यांना पुनश्च पालकांकडे सोपवले. 128 मुलांना तर 77 मुली मिळून 205 मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलातर्फे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात रेल्वे स्थानकावर अथवा रेल्वे गाडीत गस्त घालत असताना संशयास्पद मुलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून घडला प्रकार जाणून त्यांचे मनपरीवर्तन करण्यात आले. ऑपरेशन नन्हे फरीश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही आरपीएफने पार पाडली.
205 मुलांची ‘घरवापसी’
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या सहा महिन्यांत म्हणजे एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत मध्य रेल्वेतील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ व नागपूर येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने 733 मुलांची सुटका केली. यामध्ये 517 मुले आणि 216 मुलींचा समावेश आहे, चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी भेट घडविली आहे.


पालकांनी मानले यंत्रणेचे आभार
काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन तसेच शहराचे ग्लॅमर आदीच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी त्यांचे आभार मानले. भुसावळ विभागात 205 जणांना आरपीएफने ताब्यात घेत त्यांना पालकाच्या स्वाधीन केले. यात 128 मुले तर 77 मुलींचा समावेश आहे.
