भुसावळात डीआरएम कार्यालयात कर्मचार्यांना तणावमुक्तीचे धडे
Stress relief classes for staff at DRM office in Bhusawal भुसावळ : रेल्वे प्रशासन आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे येथील डीआरएम कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये ताण -तणावमुक्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा शनिवारी झाली. डीआरएम कार्यालयात शनिवारी सकाळी 11 वाजता जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त रेल्वेतील परीचालन विभाग आणि सुरक्षा विभागातील कर्मचारी यांच्या तणाव मुक्तीसाठी रेल्वे आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञ यांनी रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
ताण-तणावाच्या लक्षणांवर केले मार्गदर्शन
शांत झोप न लागणे, एकाग्रता करता न येणे, सतत ताण, टेंशन व चीड-चीड होणे आदी प्रकारे ताण-तणावाचे लक्षणे असून त्यावर मात कशी करायची, याचप्रमाणे उदासीनता, चिंता रोग, झोपेचे विकार, व्यसनाधीनता, लहान मुलांचे मनोविकार यासारख्या आजारांवर विधी मणियार, रमा कन्नान, मानसपोचार तज्ज्ञ डॉ.इंद्रायणी मिस्त्री यांनी मार्गदर्शन करून चर्चा केली.

यांची कार्यशाळेला उपस्थिती
या कार्यशाळेत डीआरएम इती पांडे, एडीआरएम (प्रशासन) सुनील कुमार सुमन, एडीआरएम (तांत्रिक) कौशैलेंद्र कुमार, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चौहान, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, डॉ.आकाश चौधरी, डॉ.कांचन नारखेडे तसेच रेल्वे शाखा अधिकारी, कर्मचारी या कार्यशाळेला उपस्थित होते.

