फैजपूरच्या सातपुडा अर्बन बँकेला बनावट कागदपत्रांद्वारे गंडा : तिघांविरोधात गुन्हा
Faizpur’s Satpura Urban Bank defrauded through forged documents : Case against three यावल : फैजपूर शहरातील सातपुडा अर्बन क्रेडिट को.ऑफ सोसायटी या बँकेची कर्जदार तसेच जामीनदार अशा तिघांनी बोगस दस्तऐवज सादर करीत एक लाखांचे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केली. यावल न्यायालयाच्या आदेशान्वये फैजपूर पोलिसात तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
फैजपूर शहरातील सातपुडा अर्बन क्रेडिट को.ऑफ सोसायटीचे व्यवस्थापक काशिनाथ डोंगर वारके यांनी यावल न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सोसायटीत कर्जदार प्रभावती रामदास बोंडे (गजानन महाराज नगर, भुसावळ) तसेच जामीनदार तथा मालमत्ता धारक दिनकर शिवराम न्हावी (सांगवी बुद्रुक) व जामीनदार ज्ञानदेव देवराम पाटील (आमोदे) या तिघांनी बँकेकडे बनावट सातबारा व बोगस नजर गहाण खत सादर करून बँकेकडून एक लाख रुपये कर्ज मिळवले आणि बँकेची फसवणूक केली. यावल न्यायालयाच्या आदेशाने फैजपूर पोलिसात तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण करीत आहे.


