भुसावळ पालिकेतर्फे दुर्गा विसर्जनासाठी तापीकाठावर क्रेनची सुविधा
नवरात्रोत्सव पदाधिकार्यांच्या बैठकीत मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची ग्वाही
Crane facility at Tapikatha for Durga immersion by Bhusawal Municipality भुसावळ : नगरपालिकेने तापी नदी पात्रात दुर्गा विसर्जनस्थळी क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्ताने सोमवारी संतोषी माता हॉलमध्ये पोलिस प्रशासनाकडून मंंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंडळाच्या पदाधिकार्यांनी शहरातील जाम मोहल्ला रोड तसेच अन्य काही रस्ते खड्डेमय असल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
तापी तिरावर क्रेनची सुविधा
भुसावळ शहरातील नवरात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी सोमवारी पोलिस प्रशासनाने मंडळाच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकार्यांना केले. यावेळी काही मंडळाच्या पदाधिकार्यांनी शहरातील तापी नदीत मूर्ती विसर्जन करण्यासाठी पालिकेने क्रेन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. यावर मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी या मागणीची तत्काळ दखल घेत विसर्जनस्थळी क्रेन उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती दिली. यावर पालिकेचे प्रशासन अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनीही सहमती दिली.

जाम मोहल्ला रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
मंडळाच्या पदाधिकार्यांनी शहरातील जाम मोहल्ला रस्ता अद्यापही खड्डेमय आहे. पाटील नर्सरी भागातून येणार्या देवी मिरवणूक या मार्गाने येतात. यामुळे या रस्त्याची डागडूजी करण्यात यावी, असा मुद्दा मांडला. गणेशोत्सवात देखील या मुद्द्यावर चर्चा झाली होती. मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही, यामुळे मंडळाच्या पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
संतोषी माता हॉलमध्ये झालेल्या बैठकीला डीवायएसपी कृष्णात पिंगळे, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, भुसावळ शहरचे निरीक्षक गजानन पडघण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रवींद्र बाविस्कर, शहर वाहतूक विभागाच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण आदी उपस्थित होत्या.

