भुसावळ तालुका ग्रामपंचायत निवडणूक : सात ग्रामपंचायतीत सदस्यांसाठी 188 तर सरपंच पदासाठी 38 अर्ज
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत शुक्रवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. सात ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदासाठी 188 तर सरपंच पदासाठी 38 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. अखेरच्या दिवशी सर्वाधिक सरपंच पदासाठी 18 तर सदस्य पदासाठी 91 अर्ज दाखल झाले.
सात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक
भुसावळ तालुक्यातील वराडसीम जोगलखोरी ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी 49, सुनसगावामध्ये सरपंच पदासाठी नऊ तर सदस्यपदासाठी 30, चोरवडमध्ये सरपंच पदासाठी आठ तर सदस्य पदासाठी 26, वेल्हाळेमध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 26, अंजनसोंडमध्ये सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 13, फुलगावमध्ये सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी 21, गोजोरेमध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 23 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या फुलगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजप विरुध्द राष्ट्रवादीचा सामना रंगणार आहे. तर वेल्हाळे ग्रामपंचायतीमध्येही हेच चित्र कायम राहिल.
पोटनिवडणुकीतही चूरस
भुसावळ तालुक्यातील तीन ग्रामंपचायतीच्या पोटनिवडणूक होणार आहे. यात शिंदी येथे दोन, हतनूरमध्ये तीन तर मांडवेदिगरमध्ये दोन असे एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणूकीत आता माघारीनंतर सरळ लढतीचे चित्र स्पष्ट होईल. या पोटनिवडणूकही चूरशीच्या होतील असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.


