निंभोर्यातील धोकादायक जलकुंभाची स्ट्रक्चरल तज्ज्ञांकडून पाहणी
निंभोरा बु.॥ : गावाला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक स्थितीत असल्याने व काही वर्षांपूर्वी त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने करण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर स्ट्रक्चरल तज्ज्ञांकडून त्याची नुकतीच पाहणी करण्यात आली. 2014-15 या वर्षी ग्रामपंचायत देखभाल दुरुस्ती योजनेतून सुमारे दोन लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ निंभोरा येथे दसनूर रोडलगत भुसावळ येथील उमेश इंटरप्राईजेस या ठेकेदाराने 23 लक्ष रुपये खर्चातून उभारला होता मात्र 2017 ग्रामपंचायतीला जलकुंभ हस्तांतरीत केल्यानंतर जलकुंभाच्या पाच कॉलमपैकी आतील प्रमुख सेंटरचा कॉलममधील सळई (आसारी) बाहेर निघून मोठा आवाज झाल्यानंतर ग्रामस्थ हादरले. पाणीपुरवठा कर्मचार्याने ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाला कळवल्यानंतर बुधवार, 18 रोजी जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन सदस्य तज्ञांनी घटनास्थळी येत जलकुंभाची पाहणी करीत नोंद घेतली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि निकष व नियमांची पायमल्ली झाल्यामुळे ही परीस्थिती उद्भभवल्याचे वस्तुस्थितीवरून प्रथमदर्शनी दिसून येते, असे तज्ज्ञ यावेळी म्हणाले.
यांची होती उपस्थिती
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे यावल येथील उपअभियंता संतोष सुरवाडे व संबंधित ठेकेदार उमेश इंटरप्राईजेसचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील सरपंच सचिन महाले, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी स्ट्रक्चरल ऑडिटर व्ही.टी.पाटील, विकास चौधरी, विद्या सराफ, दुर्गादास पाटील, ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी बराटे, अमोल खाचणे, दिलशाद शेख, सतीश चौधरी, ललित कोळंबे, युनूस खान, अकील खाटीक व ग्रामस्थ उपस्थित होते.










