भुसावळात निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू करा : इनरव्हील रेलसिटीची मागणी
भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना निवेदन देत शहरात निर्माल्य संकलनासाठी घंटागाडी सुरू करण्याची मागणी केली.
भुसावळ शहरात घरोघरी तसेच प्रत्येक मंदिरात पूजा-अर्चा केल्यानंतर निर्माल्य निर्माण होत असल्याने या निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने तसेच विल्हेवाट लावण्यासाठी नदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याने जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. निर्माल्य अस्ताव्यस्त पद्धतीने फेकल्या गेल्यामुळे त्याची विटंबना होते. या कारणास्तव ज्याप्रमाणे शहरात घंटागाडीच्या नियोजनातून कचर्याचे संकलन केले जाते तसेच निर्माल्याच्या संकलनासाठी आठवड्यातून किमान एक दिवस स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून शहर व नदीचा परीसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. तसेच अस्वच्छतेतून पसरणार्या रोगराईवर नियंत्रण येऊन साथीच्या आजारांवर सुद्धा नियंत्रण राखता येईल. याबाबत नागरीकांमध्ये जागरूकता निर्माण करून निर्माल्य संकलन गाडीची व्यवस्था करावी, अशी मागणी क्लब सदस्यांद्वारे करण्यात आली. प्रसंगी क्लच्या अध्यक्षा रेवती मांडे, सचिव सीमा सोनार, सुनीता पाचपांडे, डॉ.मृणाल पाटील, कोमल पाटील, योगीता वायकोळे, कविता पाचपांडे उपस्थित होत्या.










