भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरले
जुन्या वादातून माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या : संशयित ताब्यात
The city of Bhusawal was again rocked by murder भुसावळ : शहरात खुनांची मालिका थांबायला तयार नाही. शहरात एकीकडे दसरा सणाचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे जुन्या वादातून शहरातील
दिलीप रामलाल जोनवाल (53, रा.महात्मा फुले नगर) यांचा डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृृण खून करण्यात आला. ही घटना शहर पोलिस ठाणे हद्दीतील गरूड प्लॉट भागातील क्रांती चौकात मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली.


जुन्या वादातून केली हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील गवळीवाडा भागातील दोन संशयित आरोपींसोबत दिलीप जोनवाल यांचे जुने वाद होते व त्या वादातून मंगळवारी रात्री 11.30 वाजता गरूड प्लॉट भागात जोनवाल यांच्या डोक्यावर संशयितांनी लोखंडी पाईपाने प्रहार करीत त्यांची हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाले. जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही परीचीत होते. हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
शहर पोलिसांची धाव
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला.
महिनाभरात सहाव्यांदा खून
गत महिन्यात कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची त्याची शालकाने कौटुंबिक वादातून हत्या केली होती तर कंडारी येथे जुन्या वादातून तिघांची हत्या करण्यात आली होती. या घटना विस्मरणात जात नाही तोच बाजारपेठ हद्दीत जीम ट्रेनरची उधारीच्या पैशांच्या वादातून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटकही केली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता भयभीत झाली आहे.
