जळगावात झेरॉक्स मशीनवर बनवल्या चक्क बनावट नोटा


दोघे आरोपी जाळ्यात : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव- कलर झेरॉक्स मशीनच्या सहाय्याने शंभर रुपये दराच्या बनावट नोटा बनवणार्‍या दोघांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून 74 हजार 300 रुपयांच्या 100 रुपये दराच्या बनावट नोटांसह झेरॉक्स मशीन व नोटा बनावण्याचे साहित्य जप्त करण्यात आले तर या प्रकरणी अमजदखान अफजलखान (22, मोहम्मदीया नगर, रा.तांबापुरा) व शेख रईस शेख रशीद (25, रा.मच्छीबाजार तांबापुरा) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध एमआयडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या संशयितांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणली असल्याची शक्यता आहे.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
शहरातील तांबापुरा परिसरातील शेरा चौकात शेख रईस शेख रशीद व अमजदखान अफजलखान या दोन्ही तरुणांकडे बनावट नोटा असलेली बॅग असून त्यातील नोटा ते चलनात आणणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, रविंद्र भगवान पाटील, अनिल देशमुख , अनिल जाधव, सुधाकर रामदास अंभोरे, पोलीस नाईक अशरफ शेख निजामोद्दीन, दिपक पाटील या पथकाला संशयितांना ताब्यात घेण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार पथकाने दोघांना बनावट नोटांसह ताब्यात घेतले.


कॉपी करू नका.