चांद्रयानाच्या यशस्वीतेने जागतिक विक्रम : भरतभाई चनेरिया
स्पेलिंग व अबॅकस स्पर्धेतील विजेत्यांचा इस्त्रो शास्रज्ञाच्या हस्ते गौरव
Success of Chandrayaan sets world record : Bharatbhai Chaneria भुसावळ : भारत सध्या विविध अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर असून इतर देशांपेक्षा आपला देश पुढे जात आहे. विविध उपग्रह आपण अवकाशात सोडले असून ते सक्षमपणे कार्य करत असून चंद्रयान तीन यशस्वी करून आपण जागतिक विक्रम साध्य केला आहे. जगातील सर्व देशांमधून कमी खर्चात चंद्रयान तयार करण्यात आले असून याचा आपला सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे विचार इस्रोचे शास्त्रज्ञ भरतभाई चनेरिया यांनी येथे व्यक्त केले.
शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या सभागृहात विद्यार्थ्यांच्या गुणांच्या विकासासाठी विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे पारीतोषिक वितरण इस्रोचे माजी वैज्ञानिक भरतभाई चनेरीया व रमण सायन्स टेक्नालॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रमौली जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी चनेरिया बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर एपीजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्टचे व्हा.चेअरमन सुनील वानखेडे, श्री एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राहुल सोनार, संचालक ओंकार सोनार, सपना सोनार, माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक गोपाळ पाटील व सतीश नवलखे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात अबॅकस कॉम्प स्पेलिंग कॉम्पिटिशन यासारख्या विविध स्पर्धेत विजेते झालेल्या स्पर्धकांना या मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले. रमण सायन्सचे चंद्रमौली जोशी यांनी सांगितले की, गणित हा विषय सोप्या पद्धतीने सोडवण्याचे तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित झाले आहे ते आपण अंगीकारले पाहिजे. या पद्धतीचे त्यांनी यावेळी प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
राहुल सोनार यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात पण त्याला जागृत करण्यासाठी या प्रकारच्या परीक्षा घ्याव्या लागतात.
सुनील वानखेडे यांनी गणिताच्या टीप सांगून विद्यार्थ्यांना गणित विषय सुलभ कसे केले जाते याबद्दल सखोल माहिती दिली. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी तर आभार सपना देशमुख यांनी मानले. यशस्वीतेसाठी अमिता जोशी, यशवंत वाडगावकर, भगवती राजपूत, जया वनारा, ईश्वर सोनवणे, तरुणा हळवे, धनश्री बोदडे, गायत्री बारी, लोचना चौधरी, निकिता चौधरी, सागर अंबुस्कर, शुभम शेळके आदींनी परीश्रम घेतले.









