भुसावळात पालिकेबाहेर भाजपाने केली वाढीव ‘कर पत्रकांची होळी’
वाढीव करवाढीला विरोध : चुकांची होणार दुरुस्ती : हरकतींसाठी आता 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
In Bhusawal, BJP conducted an extended ‘Tax sheet Holi’ outside the municipality. भुसावळ : शहरात पालिकेने मालमत्ता पुर्नमुल्यांकनासाठी कंत्राटदार नेमल्यानंतर संबंधित एजन्सीने अनागोंदी कारभाराचे प्रदर्शन करीत धार्मिक स्थळांनाही नोटीसा देत देवी-देवतांच्या चरणी कर पत्रक ठेवल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती तर शहरातील नागरीकांनाही अव्वाच्या-सव्वा मालमत्ता पुर्नमुल्यांकनापोटीचे कर पत्रक दिल्याने नागरीक संतप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर भाजपाने पालिकेच्या आवारात मंगळवारी दुपारी एक वाजता आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात कर पत्रकांची होळी करीत पालिकेचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.
हरकतींसाठी आता 15 डिसेंबरची मुदत
शहरात संबंधित एजन्सीकडून कर मागणीपत्रक वाटप होताना दिसल्यास थेट चोप देण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी देत आंदोलनात खळबळ उडवून दिली. दरम्यान, आंदोलनाची दखल घेत प्रशासक जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी हरकती दाखल करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली असून चुकीच्या पद्धत्तीने झालेली आकारणी कमी करून देण्याचे आश्वासन यावेळी आंदोलकांना दिले.

15 दिवसात चुकांची होणार सुधारणा
भुसावळ पालिकेने शहरातील मालमत्तांच्या रीव्हीजनसाठी नागपूरच्या एजन्सीला कंत्राट दिले मात्र संबंधित कंत्राटदाराने मालमत्तेेच्या मोजमापात अधिक क्षेत्र, मालमत्तांचे फोटोंमध्ये तफावत, बांधकामाच्या प्रकारातील तपशीलातही गोंधळ केल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. या भोंगळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी भाजपाने मंगळवारी दुपारी एक वाजता पालिका आवारात कर मागणी पत्रकांची होळी करीत पालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमदार संजय सावकारेंसह शिष्टमंडळाने पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्याशी चर्चा केली. अधिकार्यांनी चुका झाल्याची कबुली देत पंधरा दिवसात चुकांची सुधारणा करण्याचे आश्वासन देत हरकती दाखल करण्यासाठी आता 15 डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून देण्यात आल्याचे सांगितले. शहरातील धार्मिक स्थळांना कर आकारणी होणार नसल्याचे आश्वासन मुख्याधिकार्यांनी दिले.
या पदाधिकार्यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनावेळी आमदार संजय सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, किरण कोलते, प्रा.दिनेश राठी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, सतीश सपकाळे, गिरीष महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, भाजपच्या महिला शहराध्यक्ष अनिता आंबेकर, शैलजा पाटील, अॅड.बोधराज चौधरी, अनिरुध्द कुलकर्णी, महेंद्रसिंग ठाकूर, अजय नागराणी, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, अर्जुन खरारे, संदीप सुरवाडे, रमाशंकर दुबे, अनिकेत पाटील, देवेंद्र वाणी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

पालिकेची कारवाई सुरूच राहणार : मुख्याधिकारी
मालमत्ता करांबाबत हरकती नोंदवल्यानंतर त्याबाबत नियमानुसार योग्य ती कारवाई पालिकेकडून केली जाणार असून थकबाकी वसुलीला देखील प्राधान्य देण्यात आल्याचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी ‘दैनिक तरुण’ भारतशी बोलताना सांगितले.









