यावल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 79.30 टक्के मतदान
किनगावच्या एका बुथवर 99 टक्के मतदानाचा उच्चांक ः आज मतमोजणी
79.30 percent voter turnout in Gram Panchayat elections in Yaval taluka यावल : यावल तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि चार ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत रविवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. साडेपाच वाजेनंतर काही मतदान केंद्रावर गर्दी दिसायला मिळाली. यावल तालुक्यात 22 हजार 141 मतदारांपैकी 17 हजार 557 मतदारांनी मतदान केले. तालुक्यात 79.30 मतदान झाले. किनगाव खुर्दच्या एका बुथवर विक्रमी 99.07 टक्के मतदान झाले. आता सोमवारी यावल तहसील कार्यालयामध्ये दहा लोकनियुक्त सरपंच आणि 77 सदस्यांच्या निवडी करिता मतमोजणी होईल.
लोकनियुक्त सरपंचांसह एकूण सदस्यांच्या 77 जागांसाठी निवडणूक
यावल तालुक्यात नऊ ग्रामपंचायतरच्या लोकनियुक्त 9 सरपंचांसह चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एक लोकनियुक्त सरपंचांसह एकूण सदस्यांच्या 77 जागांसाठी रविवारी मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली. मतदान केंद्राच्या बाहेर विविध उमेदवारांच्या वतीने मतदार मदत केंद्र उभारण्यात आले होते व या ठिकाणी येणार्या मतदाराला वोटर चिठ्ठी देण्याचे काम उमेदवारांकडून सुरू होते. एकूण यावल तालुक्यात शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी साडेपाच वाजेचा वेळ असल्याने त्यानंतर देखील काही मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी झाली होती तर यावल तालुक्यातील या सर्व ग्रामपंचायतच्या 22 हजार 141 मतदारांपैकी 17 हजार 557 मतदारांनी मतदान केले व तालुक्यात एकूण 79.30 टक्के मतदान झाले.

तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया
संपूर्ण मतदान प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी यांच्या देखरेखीत निवडणूक निर्णय अधिकारी जी.टी. सोनवणे, सचिन जगताप, ए.वाय.बडगुजर, एम.पी.देवरे, एम.एच.तडवी, मीना तडवी, बबीता चौधरी, एस.एल.पाटील, एच.एन.तडवी, व्ही.डी.पाटील, एन.पी.वैराळकर, ए.एस.खैरनार, एस.आर.शेकोकार, के. पी. वायसे यांनी पार पाडली. सोमवारी यावल तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजेेपासून मतमोजणीला सुरवात होणार आहे.
किनगावात विक्रमी मतदान
किनगाव खुर्दच्या प्रभाग क्रमांक दोनच्या एका बुथवर 431 मतदारांपैकी 427 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी 99.07 इतकी होती.






