यावल शहरात संतप्त तरूणांचे नगरपालिकेत आंदोलन
दिवाळी पर्वात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील पथदिवे बंद
यावल : यावल शहरातील बोरावल गेट भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली मात्र आता दीपावली पर्वास सुरवात झाली तरी येथे पथदिवे लावण्यात न आल्याने संतप्त तरुणांनी शुक्रवारी थेट नगरपालिकेत आंदोलन केले. चार तासांच्या आंदोलनानंतर माजी नगराध्यक्षांची मध्यस्थी केल्यावर पथदिवे लावण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
संतप्त तरुणांच्या आंदोलनाने खळबळ
बोरावल गेट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. या स्मारकावरील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत व ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवरत्न फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली मात्र तरीदेखील येथे बंद पथदिवे सुरू करण्यात आले नाहीत. दीपावली पर्व सुरू झाले व पर्वात सणासुदीत येथील स्मारकावर अंधार असल्यामुळे या भागातील तरुणांनी शुक्रवारी थेट नगरपालिका गाठत पथदिवे सुरू करण्याची मागणी करीत आंदोलन सुरू केले. नगरपालिकेचे विद्युत अभियंता पंकज पांडे यांच्याकडून सक्षम कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी थेट त्यांच्यावर संताप व्यक्त केला व नगरपालिकेच्या प्रवेशव्दारावर बसून त्यांनी आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.







