दीपनगरातील संच क्रमांक तीन दुरुस्तीच्या कामासाठी बंद
दिवाळीनंतरच संच होणार कार्यान्वित : वीजपुरवठ्यावर परिणाम नाही
Suite number three at Deepnagar closed for repair work भुसावळ : दीपनगर औष्णिक केंद्रातील संच क्रमांक तीन दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन करण्यात आला असून हा संच आगामी दहा दिवस वीज निर्मितीसाठी बंद राहणार आहे. दरम्यान दिवाळीच्या काळात विजेची मागणी वाढणार असली तरी राज्यात पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्याने प्रशासनाने हा संच बंद केला आहे. यामुळे वीजपुरवठ्यावर कोणताही परीणाम होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुरुस्तीच्या कामासाठी संच बंद
दीपनगर औष्णिक केंद्रातील 210 मेगावॅटचा संच क्रमांक तीन दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. दहा दिवसांसाठी हा संच बंद राहणार आहे. या काळात संचाच्या काही उपकरणांची दुरुस्ती केली जाईल. दुरुस्तीचा दरम्यान काही प्रमाणात कामे वाढली तर अजून दहा दिवसांचा काळ वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान संच क्रमांक तीनमधून वीजनिर्मिती बंद राहणार असून केवळ 500 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक चार व पाचमधून वीजेची निर्मिती केली जात आहे. दिवाळीच्या काळात घरगुती वीजेची मागणी वाढेल, मात्र या काळात राज्याला मागणीच्या तुलनेत पुरवठा केला जाणार आहे. यामुळे या काळात दीपनगरातील संच बंद असूनही कोणताही परीणाम होणार नाही. दिवाळीच्या काळात घरगुती विजेची मागणी वाढणार असली तरी औद्योगिक वापराची मागणी घटणार असल्याने पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होणार नाही. यामुळे हा संच आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजनिर्मिती सुरु होणार आहे. अजून किमान 10 ते 12 दिवसांनी हा संच कार्यान्वित होईल, अशी माहिती महानिर्मितीच्या सूत्रांनी दिली.






मागणीच्या काळात मदत
दीपनगरच्या संच क्रमांक तीनमधून चांगल्या प्रकारे वीजनिर्मिती होण्यासाठी आवश्यक दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात आले आहे. दुरुस्तीनंतर हा संच 80 टक्यांपेक्षा अधिक पीएलएफ गाठून विजेची निर्मिती करणार आहे. यामुळे राज्यातील वीजमागणीच्या काळात मदत होईल, असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड म्हणाले.


