भुसावळातील ईव्हीएम गोदामाच्या छताला आग : निवडणूक आयोगाला कळवी माहिती : जिल्हाधिकारी
सर्व ईव्हीएम सुरक्षित : जळालेल्या भागाची ताडपत्री बदलण्याचे आदेश
Fire on the roof of the EVM godown in Bhusawal: Information to the Election Commission : Collector भुसावळ : भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामातील सर्व ईव्हीएम सुरक्षित असून आगीमुळे त्यांचे कुठलेही नुकसान झाले नसल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे दिली. रविवारी रात्री 9.20 वाजेच्या सुमारास रॉकेटची ठिणगी गोदामाच्या छतावर पडल्याने प्लॅस्टीक कागद पेटला होता मात्र काही वेळेत अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करीत आग विझवल्याने अप्रिय घटना टळली होती. या अनुषंगाने सोमवारी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकार्यांनी पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या समवेत गोदामाची बाहेरून पाहणी केली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींना सीसीटीव्ही फुटेजद्वारेही आग लागल्याचे व ईव्हीएमला कुठलेही नुकसान झाले नसल्याचे दाखवण्यात आले.
निवडणूक आयोगाला माहिती कळवली
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, फटाक्याच्या ठिणगीमुळे रविवारी रात्री 9.20 वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती बंदोबस्तावरील यंत्रणेला कळताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले व अवघ्या 10 मिनिटात आग आटोक्यात आली. याबाबतची माहिती दिल्लीतील भारत निवडणूक आयोगाला कळवण्यात आली असून आगीमुळे छताचे किरकोळ नुकसान झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने त्याबाबत दुरुस्तीच्या सूचना केल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छताला लागलेली आग दाखवण्यात आली शिवाय या आगीत ईव्हीएमला कुठलेही नुकसान पोहोचले नसल्याचे सांगण्यात आले.


यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, तहसीलदार निता लबडे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, उल्हास पगारे, दीपक धांडे, दुर्गेश ठाकूर, मनसेचे विनोद पाठक, वंचित आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, काँग्रेसचे मुन्वर खान यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण व कर्मचारी बंदोबस्तासाठी हजर होते.
निविदा प्रक्रियेबाबत बैठक लावणार : जिल्हाधिकारी
भुसावळातील आठ कोटींच्या निविदा प्रक्रियेवरून सुरू असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दीपक धांडे व उल्हास पगारे यांनी पुन्हा जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली असता जिल्हाधिकार्यांनी कंत्राटदार व पालिकेची लवकरच बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.





