भुसावळात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ब्राह्मण संघ व नुपूर अ‍ॅकेडमीचा संयुक्त उपक्रम


Spontaneous response to ‘Diwali Pahat’ program in Bhusawal भुसावळ  : शहरातील ब्राह्मण संघ व नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण संघाच्या सभागृहात दिवाळी पहाट या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, 15 रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले. सर्वप्रथम ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी, दिलीप मांडळकर, दिलीप ओक, चारू भालेराव, प्रशांत पाथरकर या मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कथ्थक नृत्यांनी मिळवली दाद
प्रास्ताविक करतांना विजय जोशी यांनी शताब्दी वर्षानिमित्त नियोजित कार्यक्रमांची व ब्राह्मण संघाच्या उपक्रमाची माहिती देत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नुपूर भालेराव हिने गणेश स्तुती नृत्यातून सादर करून वातावरण निर्मिती केली. यानंतर महालक्ष्मी अष्टक यावर शांभवी निनावे, वैभवी गडे, शानवी चौधरी यांनी नृत्य सादर केले. स्वागत नृत्य जेसिका आणि यज्ञा पाटील यांनी सादर केले. शुभं कुरुद्वं कल्यानम या संस्कृत गीतावर नक्षत्रा महाले, वृषाली लांडगे, मानवी नारखेडे, मानवी पवार, तनिष्का चौधरी, भार्गवी उंबरकर यांनी सादरीकरण केले. नंतर नुपूर भालेराव हिने त्रितालातील देस रागातील तरणा कथक नृत्य सादर केले. यानंतर कथकमधून तोडे, तुकडे, आमद, परण, परमेलू, चक्रादर तोडे, तिहाई, गणेश परन हे प्रकार कथक नृत्यातून स्वराली सपकाळे, किंजल बार्‍हे व लतिका श्रीखंडे सादर केले.







दीपनृत्याने जिंकली मने
नृत्य शिक्षिका चारू भालेराव यांनी रामस्तुती सादर केली. प्रचिती कुलकर्णी हिने कथक नृत्य सादर केले. नुपूर भालेराव हिने उपशास्त्रीय प्रकारातील गीतावर नृत्य सादर केले. ‘भरी भरी मटकी जल सो’ या गीतावर किंजल बार्‍हे हिने सादर केले. अरुणी किरणी हा कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील तराना लतिका श्रीखंडे हिने सादर केला. कार्तिक महिन्यात दिवाळी आली. या गाण्यावर उपशास्त्रीय प्रकारातील नृत्य मालती श्रीखंडे, मंजू शर्मा, दीपाली पाटील, यशश्री पाटील, माधवी गडे आणि जयश्री पाटील यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व कलावंतांनी लख लखं चंदेरी तेजाची या गाण्यावर दीपनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मालती श्रीखंडे यांनी साकारलेल्या रांगोळीने लक्ष वेधले. राजेश्री देशमुख यांनी सूत्रसंचालन तर आभार रमाकांत भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारीणी सदस्य तसेच अशोक पाटील, शाम महुरकर यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !