मलकापूरच्या विवाहितेचा अपघाती मृत्यू : रीक्षा चालकाविरोधात गुन्हा
Accidental death of Malkapur married woman : Crime against rickshaw puller बोदवड : भरधाव रीक्षा उलटल्याने मलकापूर येथील विवाहिता ठार झाल्याची तर कुटूंबातील सदस्य जखमी झाल्याची घटना 12 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता उजनी दर्गा ते बोदवड रस्त्यावर घडली होती. अपघातप्रकरणी रीक्षा चालक शेख इम्रान शेख गनी (बोदवड) याच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
खड्ड्यात उलटली रीक्षा : विवाहितेचा मृत्यू
राजेंद्र रामचंद्र रायपूरे (मुक्ताईनगर रोड, मलकापूर) यांच्या तक्रारीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी ते पत्नी संगीता राजेंद्र रायपूरे (मलकापूर), मुलगा संकेत, मुलगी सुषमा यांच्यासह रीक्षा (एम.एच.19 सी.डब्ल्यू.3348) ने प्रवास करीत असताना रीक्षा चालकाने बेपर्वाईने वाहन चालवत रस्त्यावरील खड्ड्यात रीक्षा नेल्याने ती पलटी होवून संगीता रायपूरे यांचा मृत्यू ओढवला तर तक्रारदारासह त्यांची मुले जखमी झाली. विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत रीक्षा चालक शेख इम्रान शेख गनी (बोदवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सचिन चौधरी करीत आहेत.


