यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीत 30 रोजी उपसरपंच निवड
यावल : यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या ग्रामपंचायतीत उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या सर्व ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी उपसरपंच निवड होणार आहे.
ग्रामीण भागात निवडणूक फिव्हर
ग्रामीण भागातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीत सार्वत्रीक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदभार स्विकारत असून त्यांची पहिली सभा ही गुरुवार, 30 नोंव्हेंबर रोजी होणार आहे. या सभेतच उपसरपंचांची निवड होणार आहे. लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड होणार आहे. उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकिय वातावरण तापू लागले आहे. उपसरपंच पदाकरीता सध्या विविध ग्रामपंचायतीत मोर्चे बांधणीदेखील सुरू झाली आहे. यावल तालुक्यात साकळी येथे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, किनगाव खुर्द लोकनियुक्त सरपंच रूपाली कोळी, बोराळे लोकनियुक्त सरपंच संध्या राजपूत, गाडर्या लोकनियुक्त सरपंच मोतीसिंग बारेला, बोरखेडा खुर्द लोकनियुक्त सरपंच अकीला तडवी, गिरडगाव लोकनियुक्त सरपंच आशा तडवी, शिरागड लोकनियुक्त सरपंच योगीता सोनवणे, थोरगव्हाण लोकनियुक्त सरपंच मनीषा सोनवणे, म्हैसवाडी लोकनियुक्त सरपंच सुनील चौधरी व कोळन्हावी लोकनियुक्त सरपंच विकास सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड केली जाणार आहे.


सरपंच यांना दोन मतदानाचा अधिकार
उपसरपंच निवडप्रसंगी जर सम-समान मतदान झाले तर अशा परीस्थितीत उपसरपंच निवडीचा तिढा सोडवण्याकरीता लोकनियुक्त सरपंच यांना एक अतिरिक्त अर्थात दोन मतदान करण्याचा अधिकार या निवड प्रक्रीयेत असणार आहे. याबाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.





