चुंचाळ्यात उद्या सुकनाथ बाबा मूर्ती स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा

ग्रामस्थांसह शिष्यांनी जपली परंपरा : चार्तुमासाच्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आयोजकांकडून आवाहन


Suknath Baba idol installation anniversary ceremony tomorrow in Chunchale यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात श्री समर्थ सुकनाथ बाबा मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. 2000 साली श्री वासुदेव बाबांनी त्यांचे आजांगुरु श्री समर्थ सुकनाथ बाबा यांची 21 किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. ती परंपरा शिष्य व गावकरी मंडळीनी सतत सुरू ठेवली आहे.

असा होईल कार्यक्रम
सकाळी सहाला मारोती अभिषेक, साडेसहा वाजता सुकनाथ बाबा व रघुनाथ बाबा, वासुदेव बाबा, समाधीवाले बाबा यांच्या मूर्तीला स्नान व मूर्ती अभिषेक साडेसात वाजता आरती, साडेआठ वाजेपासून भजन भारुडांना सुरुवात होईल. दुपारी 12 वाजता महाआरती होऊन एक वाजेपासून महाप्रसादास सुरुवात होईल. महाप्रसाद रात्री शिष्य गणांच्या आगमनापर्यंत सुरू राहणार आहे.







अशी आहे आख्यायिका
सुकनाथ बाबांनी येथे अखंड 12 वर्ष तप केल्याने या गावास महत्व प्राप्त झाले आहे. सुकनाथ बाबा काशी येथून भ्रमण करीत चुंचाळे येथे आले. बाबांना पशू -पक्षांची बोली अवगत होती. वर्षाकाठी पशू-पक्षांना सहा ते सात क्विंटल धान्य दररोज खाऊ घालत होते. बारा वर्ष ज्या जागेवर बाबांनी तप केले त्या ठिकाणी असलेली मातीची टेकडी गावकरी मंडळीना उकरायला सांगितली असता त्यामध्ये पुरातन समाधी निघाली. त्या दिवसांपासून पूजा-आरती सुरू करून बाबांची समाधीवाले बाबा अशी ओळख झाली. श्री सुखनाथ बाबांनी 110 वर्षापूर्वी येथे बालकांना शिक्षणासाठी शाळा सुरू केली व बालकांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे कार्य केले.

अध्यात्मिक व शैक्षणिक कार्य
श्री सुकनाथ बाबाना चुंचाळे येथेच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली ते म्हणजे श्री रघुनाथ बाबा होय. रघुनाथ बाबांनी नाथ साम्प्रदायाच्या प्रचारासाठी आपल्या हाती झेंडा घेत कार्य सुरू केले. त्यांच्यासोबत श्री वासुदेव बाबा हे स्वतः चे घर सोडून आध्यात्मिक कार्य करू लागले. श्री सुकनाथ बाबा व रघुनाथ बाबांनी वर्डी (ता.चोपडा) येथे समाधी घेतली आहे. गुरुंच्या आदेशाने श्री वासुदेव बाबांनी आध्यात्मिक व शैक्षणिक कार्य सुरू केले. गावात मंदिराचे तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे व सुकनाथ बाबा वनवासी वस्तीगृहाचे बांधकाम केले आहे.

21 किलो पंचधातूची मूर्ती
कर्नाटकमधील उमदी गावातून 98 वर्षाच्या मूर्तीकाराने तयार केलेली 21 किलो पंचधातूची मूर्ती तयार करण्यात आली. याच मूर्तीचे दोन वर्षानंतर म्हणजे सन 2000 साली भक्ताच्या व गावकर्‍यांच्या आग्रहाखातर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री सुखनाथ बाबांच्या मूर्ती स्थापनेच्या वेळी गावातील सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना रंगरगोटी करण्यात आली. मूर्तीची मिरवणूक तडवी वाड्यातून मशिदीपर्यंत गेल्याने सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला. यावेळी चातुर्मासाचा कार्यक्रम देखील होतो. दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा भक्तगणांनी व ग्रामस्थांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !