किन्ही शिवारातील लघूदाब वाहिनीच्या वीज तारांची चोरी
Theft of power lines of low pressure channel in Kini Shiwar भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून शेत-शिवारातील वीज उपकरणांच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. किन्ही शिवारातील महावितरणच्या रोहित्रावरील दहा हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनीयम तार चोरट्यांनी लांबवले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. याबाबत महावितरणच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजपुरवठा खंडित : शेतकर्यांचे हाल
किन्ही, ता.भुसावळ येथील महावितरणच्या रोहित्र क्रमांक 4612301 वरील लघूदाब वाहिनीवरील अॅल्युमिनीयमची वीजपुरवठा करणारी 10 हजार रुपये किंमतीची तार 23 नोव्हेंबरच्या रात्री ते 24 नोव्हेंबरच्या सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी लांबवली. या रोहित्रावरील वीजपुरवठा 23 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू होता मात्र 24 नोव्हेंबर रोजी वीजपुरवठा खंडीत असल्याने ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यानंतर महावितरणने पाहणी केली असता सुतारी शिवार रोहित्र क्रमांक 4612301 यावरील लघूदाब वाहिनीवरील सात गाळ्यांतील अॅल्युमिनीयमची तार चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघडकिस आला.


सध्या रब्बीच्या हंगामाला पाणीपुरवठा करण्यासाठी वीजपुरवठा गरजेचा आहे. या काळातच भुसावळ विभागात शेती शिवारातील महावितरणच्या उपकरणांची चोरी वाढली आहे. दरम्यान यामुळे वीजपुरवठा खंडीत राहत असल्याने शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या चोरी प्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंता कविता सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश राठोड करीत आहेत.
