भुसावळात रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरतात तेव्हा…!
भुसावळातील सुरक्षा यंत्रणा सतर्कतेत पास : मॉक ड्रिल कळताच प्रवाशांना दिलासा
When terrorists enter railway station in Bhusawal…! भुसावळ : रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या बुकींग कार्यालयानजीक रेल्वे प्रवाशांची वर्दळ सुरू असताना रविवारी सकाळी कुलींच्या वेशात तोंडाला लाल रूमाल बांधून तीन दहशतवादी शिरल्याची माहिती कळताच प्रवाशांचा थरकाप उडाला व पाहता-पाहता प्रवाशांची मोठी गर्दी जमली तर काही क्षणात ही बातमी रेल्वे आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांना सतर्कतेच्या सूचना देत अफवा पसरणार नाही याची काळजी घेतली तर जिल्ह्यावरून दंगा काबू पथकासह पोलिस यंत्रणा दाखल झाली. दिड तासाच्या परीश्रमानंतर कथित दशतवाद्यांना ताब्यात घेण्यात सुरक्षणा यंत्रणांना यश आले. अर्थात हा सर्व प्रकार मॉकड्रिल (सतर्कता चाचणी) असल्याचे कळताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. आगामी महापरीनिर्वाण दिन तसेच जळगाावतील पंडित मिश्रा यांच्या आयोजित कथेच्या अनुषंगाने सुरक्षा चाचणी घेण्यात आली व त्यात स्थानिक सुरक्षा यंत्रणा पास झाल्या.
अफवा, धावपळ व सतर्क यंत्रणांची सतर्कता
रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कुलींच्या वेषात तीन दहशतवादी दक्षिण बाजूकडील तिकीट बुकींग कार्यालयानजीकच्या कुली रूममध्ये शिरल्याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचताच प्रवाशांमध्ये थरकाप उडाला तर याबाबतची माहिती रेल्वे लोहमार्ग यंत्रणेला कळताच भुसावळ लोहमार्ग पोलीस निरीक्षक विजय घेर्डे यांनी अग्निशमन दल, आरोग्य पथक, बीडीडीएस, रॅपीड अॅक्शन फोर्स व रेल्वे सुरक्षा बलाला सूचित केले. अवघ्या 15 मिनिटात यंत्रणा दाखल झाली. सुरूवातीला परीसर निर्मनुष्य करण्यात आला तर शस्त्रसज्ज जवानांनी काही क्षणात आश्रयाला लपलेल्या तिघा अतिरेक्यांचा शोध घेत ताब्यात घेतले. सुरूवातीला स्थानकात अतिरेकी शिरल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये काही क्षणापुरता भीती पसरली मात्र नंतर हे केवळ सतर्कतेचे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) असल्याचे कळताच प्रवाशांच्या जीवात जीव आला.


सतर्कतेची घेतली चाचणी
सण-उत्सवाच्या काळात तसेच गर्दीच्या हंगामात अनेक अफवा यंत्रणांच्या कानावर येतात तसेच अनेकदा निनावी दूरध्वनी येतात वा वेळप्रसंगी बेवारस बॅग आढळल्यानंतर यंत्रणांचा गोंधळ उडतो. या पार्श्वभूमीवर यंत्रणेची सतर्कता व सज्जता तसेच आपत्कालीन स्थितीत घ्यावयाची काळजी या पार्श्वभूमीवर सुरक्षणा यंत्रणांनी रविवारी सकाळी 11.30 ते 1 दरम्यान रेल्वे स्थानकावरील बुकींग खिडकीजवळ मॉक ड्रिल घेतले. आगामी परीनिर्वाण दिन तसेच जळगावात पंडित मिश्रा यांच्या कथेचे आयोजन असल्याने होणार्या गर्दीच्या अनुषंगाने यंत्रणा कितपत सजग आहेत याची चाचणी घेण्यात आली.
दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वे स्थानकाबाहेर दंगा काबू योजनेची रंगीत तालीम राबविण्यात आली. यावेळी आरएसआय पवार तसेच कवायत मास्तर सय्यद यांनी जमावाला कसे पांगवावे या संदर्भात कर्मचार्यांना लाठीसह ढालबाबत प्रशिक्षण दिले. रविवारी सकाळी 11.30 ते एक पर्यंत ही तालीम चालली.
यांचा मॉक ड्रिलमध्ये सहभाग
भुसावळ लोहमार्ग निरीक्षक विजय घेर्डे, सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब मगरे, 20 पोलिस अमंलदार, क्यूआरटी पथक, जळगाव आरएसआय पवार, 22 पोलिस अमंलदार, आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, एसआयपीएफ दोन, 10 कर्मचारी, आय.बी. भुसावळ येथील निरीक्षक पाठक, एसआयबी, सीआयबी कर्मचारी तसेच श्वान पथकातील दोन कर्मचार्यांसह श्वान असे एकूण 58 कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिकेतर्फे अग्निशामक दलाचे वाहन व स्टॉफ, रुग्णवाहिका व डॉक्टर तसेच क्यूआरटी पथकातील दोन वाहन, लोहमार्ग व अन्य वाहने मिळून सात शासकीय वाहने रंगीम तालीममध्ये सहभागी झाली.
