यावल-फैजपूर रस्त्यावर दुचाकी घसरली : पातोंडीतील तरुणाचा मृत्यू
Two-wheeler falls on Yaval-Faizpur road : Patondi youth dies यावल : फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावापुढे यावलकडे येत असतांना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या मागे बसलेला 20 तरूण गंभीर जखमी झाला होता मात्र उपचारादरम्यान त्याचा र्मत्यू झाला. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल सुनील सोनवणे (20, पातोंडी, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.
उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
यावल-फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावाजवळ फैजपूरकडून यावलकडे दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 ई.ई. 9659) घेऊन निलेश किरण कोळी (पातोंडी, ता. रावेर) हा येत होता व त्याच्यामागे विशाल सुनील सोनवणे हा बसला होता. दरम्यान भरधाव वेगात दुचाकी असतांना समोरून अचानक समोर चारचाकी आली आणी दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्लिप झाली. या अपघातामध्ये विशाल सोनवणे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने यावल रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव व नंतर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारदरम्यान विशालचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात सुनील सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दुचाकीचालक निलेश कोळी याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


