भुसावळातील सर्वात मोठ्या टॉवर क्लॉकचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते उद्घाटन

भुसावळ जेसीआयचे ताप्ती क्लबचे सामाजिक कार्य उल्लेखनीय : आमदार संजय सावकारे


Biggest tower clock in Bhusawla inaugurated by MLA Sanjay Savkare भुसावळ : चांगले काम केल्याने निश्चितच समाधान मिळते. सामाजिक क्षेत्रात काम करताना शहरासाठी काही चांगले करता आल्यास त्याचे समाधान चिरकाल राहते. जेसीआयच्या माध्यमातून देशात तीन सर्वात उंच क्लॉक टॉवर उभारण्यात आले असून भुसावळातही अशा पद्धत्तीचा क्लॉक टॉवर महिला संघटनेतर्फे उभारण्यात आल्याने ही बाब निश्चितच भुसावळकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे मत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले. भुसावळ जेसीआय ताप्ती क्लबच्या माध्यमातून जामनेर रोडवरील मोटूमल शोभराज चौकात रविवारी सायंकाळी सहा वाजता सर्वात उंच अशा टॉवर क्लॉकचे उद्घाटन आमदार सावकारे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

चांगले कार्य नेहमीच स्मरणात
आमदार संजय सावकारे म्हणाले की, जेसीआय अध्यक्षपद पत्नीला सुरूवातीला मिळत असल्याने घ्यावे की नाही हा प्रश्न होता मात्र सामाजिक कार्य हातून होणार असल्याने आपण त्यास होकार दिला व रजनी सावकारे यांनी अत्यंत चांगले काम करून दाखवल्याने जेसीआयला तब्बल 27 पुरस्कार मिळाले. शहरातील गजबजलेल्या चौकात टॉवर क्लॉक उभारण्याची संकल्पना मांडल्यानंतर आपण तातडीने त्यास मंजुरी दिली व कामाला सुरूवात झाली. विकास पाचपांडे यांची त्यासाठी मोठी मदत झाली. सामाजिक क्षेत्रात तुम्ही चांगले काम केल्यास ते निश्चितच जनतेच्या कायम स्मरणात राहते, असेही आमदार म्हणाले. कार्यक्रमादरम्यान खासदार रक्षा खडसे यांनी धावती भेट देत आमदारांना तसेच जेसीआयच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.


टॉवर क्लॉकचे श्रेय आमदारांना
जेसीआय क्लब अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाले की, अध्यक्षपद मिळाल्यानंतर चांगले काम करता आल्याचे समाधान निश्चित आहे. जेसीआयचा टॉवर क्लाक हा नॅशनल प्रोजेक्ट आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले व आमदारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला टॉवर क्लॉकचे उद्घाटन होत असल्याने त्याचे समाधान आहे. जेसीआयला मिळालेले 27 अ‍ॅवॉर्डचे श्रेय मी संपूर्ण जेसीआय टीमच्या सदस्यांना देते. संपूर्ण भारतात जेसीआयच्या माध्यमातून तीन क्लॉक टॉवर उभारण्यात आले असून भुसावळातील टॉवर केवळ महिलांच्या संघटनेतर्फे निर्माण करण्यात आल्याने देशभरात आता जेसीआय भुसावळ ताप्ती क्लबच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे .भुसावळ पालिकेने क्लॉक टॉवरसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांचेही आभार, असेही रजनी सावकारे म्हणाल्या. झोन प्रेसिडेंट जितेंद्र बोहरा म्हणाले की, आगामी काळात विविध कार्य जेसीआय भुसावळ ताप्तीच्या माध्यमातून राबवण्यात येतील. निलेश झंवर म्हणाले की, देशभरात टॉवर क्लॉकमुळे आता भुसावळ ताप्ती क्लबला ओळख मिळाली आहे तसेच प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर जेसीआय भुसावळ ताप्ती क्लबला अ‍ॅवॉर्ड मिळाले आहेत.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, जेसीआय भुसावळ क्लब अध्यक्षा रजनी सावकारे, जेसीआय झोन प्रेसिडेंट जितेंद्र बोहरा, माजी राष्ट्रीय अध्यक्ष निलेश झंवर, लेडी जेसी ऑफिसर संगीता अग्रवाल, डॉ.संगीता बियाणी, विकास पाचपांडे, डॉ.रश्मी शर्मा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेवक व उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, व्यापारी संघाचे अध्यक्ष राध्येश्याम लाहोटी, तेजस नवगाळे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, दिनेश चांदवाणी, अनिल साहनी, मुकेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे जेसीआय सदस्यांतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सूत्रसंचालन हेमा बेहरा यांनी करून आभारही मानले.

यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी जेसीआय अध्यक्षा रजनी सावकारे, सचिव जयश्री अग्रवाल, प्राची अग्रवाल, डॉ.संगीता बियाणी, दीपा पटेल, डॉ.सोनल झंवर, इशा मनवानी, संगीता अग्रवाल, वर्षा जैन, हेमा बेहरा, नम्रता चोरडीया, प्रिया छाबडा, निकीता अग्रवाल, ज्योती दरगड, योगीता झंवर, मोनिका अग्रवाल, सुनीता दरगड, सुनीता अग्रवाल, आभा दरगड, स्मिता बियाणी यांच्यासह सर्व जेसीआय सदस्यांनी तसेच रोटरी रेल सिटी सदस्यांनी परीश्रम घेतले.

नारीशक्तीच्या संघटनातून उभार क्लॉक टॉवर : चौकाची वाढली शोभा
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या जेसीआय क्लबतर्फे देशभरात तीन ठिकाणी अशा पद्धत्तीने क्लॉक टॉवर उभारण्यात आले आहेत मात्र भुसावळ ताप्ती जेसीआयतर्फे केवळ महिलांच्या संघटनेतर्फे एकत्र येवून क्लॉक टॉवर संकल्पना राबवण्यात आल्याने देशभरात आता भुसावळ जेसीआय क्लबचे नाव पोहोचले आहे. शिवाय जामनेर रोडवरील मोटूमल शोभराज चौकाची (चांदवाणी चौक) या टॉवरमुळे शोभादेखील वाढली आहे. सौर उर्जेवर घड्याळ चालणार असून विजेच्या खर्चातही त्यामुळे बचत होणार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !