पीएपी कर्मचार्याचा मृत्यू : तिघा आरोपींना न्यायालयीन कोठडी
भुसावळ : पायात सुरक्षा बुट नसल्याच्या कारणावरून सुरक्षा रक्षकांनी दीपनगरातील पीएपी पदावर कार्यरत असलेल्या संजय बळीराम बर्हाटे (46, रा.फेकरी) यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता घडली होती. या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता तर सुरक्षा अधिकारी संजय आनंदा लोकरे यांच्यासह सागर संदीप मोरे (22) व राजेश ज्ञानबा बनसोड (25, दोन्ही फेकरी) यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यानंतर सोमवारी ती संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
एक आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयात
मृत संजय बर्हाटे यांच्या मृत्यूस ठरल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर पोलिस कोठडीत असताना राजेश ज्ञानबा बनसोड याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर भुसावळातील खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यास जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तपास तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



