भुसावळातील शिवसेना उपशहरप्रमुखाचा नशिराबादनजीक अपघाती मृत्यू
Accidental death of Shiv Sena sub city chief near Nashirabad in Bhusawal भुसावळ : भुसावळातील उद्धव ठाकरे गटातील उपशहरप्रमुखाचा नशिराबादनजीक अज्ञात वाहनाच्या दिलेल्या धडकेने अपघाती मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडला. धनराज जगन ठाकूर (33, दीनदयाल नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू
धनराज जगन ठाकूर हा तरुण ठाकरे गटाचा शिवसेना उपशहरप्रमुख म्हणून कार्यरत होता शिवाय चहाची टपरी टाकून आपल्या कुटूंबाला हातभार लावत होता. गुरुवारी कामानिमित्त तरुण जळगाव येथे पल्सर दुचाकी (एम.एच.19 सी.सी.0651) ने गेल्यानंतर रात्री शहराकडे परतत असताना गोदावरी रुग्णालयाजवळ कुठल्यातरी धावत्या वाहनाचा फटका बसल्याने तरुणाच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवला तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. भुसावळातील दीनदयाल नगरात ही माहिती कळताच कुटूंबियांनी मोठा आक्रोश केला. माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. नशिराबाद पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भुसावळातील ट्रामा सेंटरमध्ये शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दुपारी एक वाजता तापी नदीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परीवार आहे.







