भुसावळात ट्रकच्या धडकेने 16 वर्षीय विद्यार्थी जखमी
A 16-year-old student was injured after being hit by a truck in Bhusawal भुसावळ : भरधाव ट्रकने धडक दिल्याने शहरातील खडका रोडवरील बी.झेड.उर्दू हायस्कूलचा 16 वर्षीय सायकलस्वार विद्यार्थी जखमी झाला. हा अपघात शहरातील खडका रोडवरील आशा कॉम्प्लेक्सनजीक गुरुवारी दुपारी दोन वाजता घडला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल
शेख गफ्फार अहमद (56, मुस्लीम कॉलनी, खडकारोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, खडका रोडवरील आशा कॉम्प्लेक्सनजीक गुरुवारी दुपारी दोन वाजता संशयित फैजान खान अमान खान (वरदी, ता.चिखली) याने आपल्या ताब्यातील ट्रक (एम.एच.04 बी.यु.3572) अत्यंत बेपर्वाईने व रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवल्याने फिर्यादीचा पुतण्या काशीप जफर शेख (16, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हा जखमी झाला. बी.झेड.हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारा काशीप जफर शेख हा विद्यार्थी दुपारची सुटी झाल्याने शाळेतून सायकलीने घराकडे जात असताना भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रकचे चाक काशीप शेख या विद्यार्थ्याच्या पायावरून गेल्याने त्याचा पाय निकामी झाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. तपास हवालदार महेश चौधरी करीत आहेत.


