यावल ग्रामीण रुग्णालयात तणाव मुक्ती शिबिर : 393 रुग्णांची तपासणी
Stress Relief Camp at Yaval Rural Hospital : Examination of 393 patients यावल : शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे ताण-तणाव मुक्ती व मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात यावल शहर व तालुक्यातील तब्बल 393 रुग्णांनी या ठिकाणी येऊन आपली तपासणी केली. यातील काही गरजवंतांना जागेवर औषध उपचार व काहींना समुपदेशन करण्यात आले. काही गरजू रुग्णांना पुढील विचारासाठी जळगाव येथे नेण्यात येणार आहे. सकाळपासूनच या शिबिरासाठी रुग्णांनी गर्दी केली होती.
393 रुग्णांची तपासणी
यावल ग्रामीण रुग्णालयात शनिवारी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने ताण-तणाव मुक्ती, मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. यात रुग्णालयाच्या बाहेर मंडप टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांची तपासणीसाठी वेगवेगळे पथक या ठिकाणी उपस्थित होते. या शिबिरात मानसोपचार तज्ञ डॉक्टरांचे पथक, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाची वैद्यकीय पथक रुग्णांच्या तपासणीसाठी उपस्थित होते. या शिबिरामध्ये शहर आणि तालुक्यातून 185 महिला तर 208 पुरुषांची उपस्थिती होती. एकूण 393 रुग्णांची या ठिकाणी तपासणी करण्यात आली. गरजूंना जागेवरच औषध उपचार देण्यात आला तर काही मानसिक पीडित रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्याचप्रमाणे या शिबिरात तज्ञांनी समुपदेशन देखील केले तर गरजवंतांची रक्त चाचणी व इतर तपासण्यादेखील मोफत करण्यात आल्या.





शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत सुपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिरामध्ये यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय कुरकुरे, बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत जावळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी, तज्ज्ञ डॉ.विजय पिठोळे, डॉ.तुषार सोनवणे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे राकेश अहिरे, विकास पाटील, कार्यक्रमाधिकारी तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ.कांचन नारखेडे, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.सुदर्शन राघव, डॉ.लावण्या वारीयर, डॉ.परितोष मंदोरकर, यावल रुग्णालयाच्या डॉ.वैशाली निकुंभ, डॉ.परवीन तडवी, इकबाल तडवी, राजनंदनी पाटील, छाया नन्नवरे, रवींद्र माळी, सुभाष कुळकर्णी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मानस तज्ज्ञ दौलत निमसे यांनी केले तर आभार शिबिराचे व्यवस्थापक कांचन चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी मानसोपचार विभागाच्या ज्योती पाटील, विनोद गडकर, राखी भगत, मिलिंद बरोट, चंद्रकांत ठाकूर, अधिपरीचारीका ज्योत्स्ना निंबाळकर, देवेंद्र जवरे, कनिफनाथ कादे यांनी परीश्रम घेतले.

