भुसावळात रेल्वेची पेन्शन अदालत : 12 लाखांची रक्कम कर्मचार्यांच्या खात्यात
Bhusawalat Railway Pension Adalat : 12 lakhs in employee’s account भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील निवृत्त कर्मचार्याच्या तक्रारीबाबत 15 डिसेंबरला येथील कृष्णचंद्र सभागृहात वर्ष 2023 च्या द्वितीय पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले. 138 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात 12 तक्रारदारांच्या वेतनाबाबत तक्रारी असल्याने त्यांच्या बँक खात्यात 12 लाख 88 हजार 47 रूपये वर्ग करण्यात आले. या पेन्शन अदालतीच्या न्यायाधीश डीआरएम इती पांडे होत्या.
एकूण 138 तक्रारी प्राप्त
रेल्वेतील निवृत्त कर्मचार्यांच्या समस्यांचे निवारणासाठी वर्षातून दोन वेळा पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येते. संबंधित पेन्शन अदालत आयोजित करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी सुचना देऊन तक्रारी, समस्या निवृत्त कर्मचार्यांकडून मागविण्यात येतात. 2023 च्या द्वितिय पेन्शन अदालतीत एकूण 138 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात 12 तक्रारी या वेतनाच्या संबंधित होत्या. पेन्शन अदालतीत एकूण 12 लाख 88 हजार 47 रुपयांची रक्कम पेन्शनर्सच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली. यावेळी 37 पीपीओचे व परिवार पेन्शनचे रिव्हीजन करण्यात आले. प्रशासनाने पेन्शनर्सच्या तक्रारीचे संपूर्ण निराकरण केले. पेन्शन अदालतमध्ये मुख्य न्यायाधीश डीआरएम इती पांडे होत्या. यावेळी एडीआरएम (प्रशासन) सुनील कुमार सुमन तसेच लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.एस.काज़ी यांनी केले.


सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले. तसेच पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पेन्शन अदालतमध्ये डीआरएम पांडे यांनी पेन्शनर्सना भविष्यात त्रास होणार नाही यासाठी प्राप्त तक्रारी वेळेवर सोडवण्यात येतील याचे पेन्शनर्सना आश्वासन दिले. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी अतुल रायकवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक यांनी सहकार्य केले.





