कृतज्ञतेने परमेश्वराचे स्मरण करणे म्हणजे उपासना : प्रवचनकार सुनंदा चव्हाण


भुसावळ : निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. परमेश्वर दिव्य सच्चिदानंद स्वरूपाने तुमच्या हृदयात आहे. परमेश्वर म्हणजेच विराट चैतन्य शक्ती अशा या परमेश्वराला पद्धतशीर व्यवस्था रूपात पाहणे म्हणजे परमेश्वराची खरी उपासना होय. कृतज्ञतेने परमेश्वराचे स्मरण करणे म्हणजे उपासना. उपासना यज्ञाला कोणत्याही साहित्याची गरज नाही. स्थळ, काळाचे बंधन नाही. खर्‍या उपासनेसाठी आपण पुढील विश्वप्रार्थना म्हटली पाहिजे, असे मत प्रवचनकार सुनंदा चव्हाण यांनी केले. जय गणेश जेष्ठ नागरिक संघातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या ‘सुख माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ याविषयी त्या बोलत होते.

अपाय आहे तेथे उपायही आहे
जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ सुरभी नगर, भुसावळची साप्ताहिक सभा संघ उपाध्यक्ष पोपटराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या सतशिष्या प्रबोधनकार, प्रवचनकार सुनंदा चव्हाण, नाशिक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथींचा परिचय संघाचे सल्लागार दिनकर जावळे यांनी करून दिला. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कितीही दु:ख आले तरी ते निवारण्यासाठी उपाय असतातच. अपाय असतो तेथे उपाय असतोच म्हणून दुःखाने डगमगू नका. भरून येते ते आभाळ, निरभ्र असते ते आकाश हे लक्षात घ्या, असे मतही प्रवचनकार सुनंदा चव्हाण यांनी व्यक्त केले.


नित्यनेम आचरणात आणा
विश्वप्रार्थना नित्यनेमाने म्हणून आचरणात आणावी, सत्कर्म केल्यास त्याचे फळ मिळतेच यामुळे नित्यनेम आचरणात आणावे विश्वप्रार्थना आत्मिक बळ देते. राष्ट्रप्रेम, राष्ट्र प्रगती, राष्ट्रशिस्त, राष्ट्रसंरक्षण व राष्ट्र कर्तव्य हे राष्ट्रीय जीवनाचे पंचशील लक्षात घेऊन त्याचे मनःपूर्वक पालन केले पाहिजे. हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवावी, असे आवाहन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव पाटील यांनी केले.

पेराल ते उगवेल म्हणून सत्कर्म करा
जीवन जगताना जीवनाची वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे, बुद्धीचा योग्य वापर करणे, मानवतावाद जपणे ही असावीत. निसर्ग नियमाचे पालन करा. आपल्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, सहस्र प्रतिक्रिया सुद्धा असते. पेराल तसे उगवते. तुम्ही जेव्हा दुसर्‍यांना सुख किंवा दुःख द्याल तेव्हा ते सुखदुःख तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्त्रपटीने परत येईल हा निसर्गाचा अटळ नियम आहे. संसारी जीवनात राहून विश्वप्रार्थनेच्या माध्यमातून केलेली उपासना हीच खरी ईश्वर उपासना असते, असे मतही सुनंदा चव्हाण यांनी व्यक्त केले.

यांनी केले सहकार्य
सूत्रसंचालन सचिव डी.एम.तिडके यांनी केले. छायाचित्रण डी. यू. इंगळे यांनी केले. कार्यक्रमास जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ, जय गुरूदेव ज्येष्ठ नागरिक मंडळ, रेणुका माता ज्येष्ठ नागरिक संघ, कुर्‍हे पानाचे आदींचे पदाधिकारी, सभासद व परिसरातील नागरीक उपस्थित होते. यशस्वितेसाठी कोषाध्यक्ष शांताराम बोबडे, सल्लागार दिनकर जावळे यांच्यासह सर्व उपस्थितांनी सहकार्य केले. संघ उपाध्यक्षा जयश्री ढाके यांनी उपस्थितांचे आभार मानले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !